

Gurgaon rape case
गुडगाव: लिफ्ट घेतलेल्या एका २५ वर्षीय महिलेवर व्हॅनमध्ये दोन नराधमांनी ३ तास लैंगिक अत्याचार करून बेदम मारहाण केली. नंतर धावत्या गाडीतूनच तिला रस्त्यावर फेकून दिले. गुरुग्राम-फरीदाबाद महामार्गावर सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. यामध्ये पीडित महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यात फरीदाबादमधील निर्जन रस्त्यांवरून व्हॅन फिरवत असताना त्या महिलेला जवळपास तीन तास ओलीस ठेवण्यात आले होते. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
तक्रारीनुसार, सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास आईसोबत झालेल्या वादानंतर पीडित महिला घराबाहेर पडली होती. आपण मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे तिने आपल्या बहिणीला सांगितले होते. दोन-तीन तासांत घरी परतते असे तिने म्हटले होते, मात्र तिथून निघताना तिला उशीर झाला. जेव्हा ती शेवटी तिथून निघाली, तेव्हा रात्रीचे सुमारे १२ वाजले होते. त्यामुळे घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन नसल्यामुळे तिने एका व्हॅनमध्ये लिफ्ट घेतली.
पोलिसांनी सांगितले की, व्हॅनमध्ये दोन पुरुष होते. तिला गाडीत बसवल्यानंतर, त्यांनी तिला घरी नेण्याऐवजी गुडगाव-फरीदाबाद रोडच्या दिशेने गाडी नेली. तिला हनुमान मंदिराजवळील निर्जन भागात नेण्यात आले. कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे रस्त्यावर लोकांची वर्दळ कमी होती, त्यामुळे महिलेने मदतीसाठी दिलेली हाक कोणापर्यंत पोहोचू शकली नाही. त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास एसजीएम नगरमधील राजा चौक येथील मुला हॉटेलजवळ तिला व्हॅनमधून खाली ढकलून देण्यात आले.
महिलेने कसाबसा आपल्या बहिणीशी संपर्क साधला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला दिल्लीतील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता, परंतु कुटुंबीयांनी तिला फरीदाबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.