

Crime News
कानपूर: कानपूरमधील एका गावात बुधवारी रात्री दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून एका महिलेने आपल्या पतीवर कुऱ्हाडीने तब्बल २६ वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वीरंगना (वय ३५) या महिलेला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.
रविशंकर सविता (वय ४५) उर्फ पप्पू असे मृत व्यक्तीचे नाव असून तो फरशी बसवण्याचे काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी पती-पत्नी दोघेही नशेत होते. ही घटना घडली तेव्हा त्यांचा चार वर्षांचा मुलगा घरातच होता. घटनेनंतर घाबरलेला मुलगा एका खोलीत लपून बसला होता, अशी माहिती एसीपी आशुतोष कुमार यांनी दिली. या झटापटीत वीरंगना हिच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर वीरंगनाने स्वतः पोलिसांना फोन करून पती अपघातात जखमी झाल्याचे सांगितले. मात्र, जेव्हा पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ती रक्ताचे डाग पुसताना आढळली. पोलिसांना पायऱ्यांवर रक्ताने माखलेले कपडे आणि अंगणात एक लाकडी स्टूल सापडले, मात्र हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड बेपत्ता होती.
पप्पूला तातडीने लाला लजपत राय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर २६ जखमांच्या खुणा आढळल्या असून, अतिरक्तस्रावामुळे तो कोमात गेला आणि त्याचा मृत्यू झाला, असे नमूद करण्यात आले आहे.
पप्पूच्या भावांनी पोलिसांना सांगितले की, २०१९ मध्ये त्याचे वीरंगनाशी लग्न झाले होते. हे दोघेही दारूच्या आहारी गेले होते आणि नशेत त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दोघेही दारूच्या व्यसनामुळे सतत भांडायचे आणि एकमेकांविरुद्ध बिठूर पोलीस ठाण्यात तक्रारीही करायचे. वीरंगना ही तिच्या पतीपेक्षा जास्त दारू प्यायची आणि तिच्या वागणुकीमुळे तिचे वडीलही अनेकदा त्रस्त असायचे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.