

Crime News
गुरुग्राम: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका २५ वर्षीय महिलेवर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुरुग्राममध्ये ही घटना १९ डिसेंबरच्या रात्री घडली असून, पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील बडौत येथून दोन संशयीत आरोपींना अटक केली. तुषार उर्फ जॉन्टी (वय २५) आणि शुभम उर्फ जॉनी (वय २४) अशी त्यांची नावे असून दोघेही दिल्लीच्या संगम विहारचे रहिवासी आहेत.
दिल्लीतील नजफगड येथील रहिवासी असलेल्या कल्पना (वय २५) ही गुरुग्राममधील एका क्लबमध्ये काम करते. तिचे पतीने पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, १९ डिसेंबरच्या रात्री साधारण १ च्या सुमारास कल्पनाने त्याला फोन करून सांगितले की, संगम विहार येथील रहिवासी असलेल्या तुषारने तिच्यावर गोळी झाडली असून तिला रुग्णालयात नेले जात आहे. पतीच्या म्हणण्यानुसार, तुषार सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरी आला होता. तेव्हा त्यांच्यात वाद झाला, त्याच रागातून त्याने गोळी झाडली.
१९ डिसेंबर रोजी एका महिलेला गोळी लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात पोहोचून वैद्यकीय अहवाल प्राप्त केला. प्राथमिक चौकशीत तुषारने सांगितले की, तो दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करतो आणि गेल्या सहा महिन्यांपासून त्याची पीडितेशी मैत्री होती. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, परंतु तिने वारंवार नकार दिला होता. १९ डिसेंबरच्या रात्री तुषार आणि शुभम त्या क्लबमध्ये गेले जिथे कल्पना बसली होती. तिथे तुषारने पुन्हा लग्नाचा प्रस्ताव मांडला. तिने नकार देताच रागाच्या भरात तुषारने तिच्यावर पिस्तुलाने गोळी झाडली आणि तेथून उत्तर प्रदेशातील बागपत येथे पळून गेला. गोळी महिलेच्या पोटाला लागली आहे.