

Akola Crime News
अकोला : रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिचा जन्मदाता बाप, सख्खा काका आणि शेजाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
पीडित मुलगी गेल्या काही दिवसांपासून भीतीखाली होती. अखेर तिने धिर एकवटून शाळेत आपल्या वर्गशिक्षकांकडे घरी होत असलेल्या छळाचा पाढा वाचला. आपल्यावर बाप, काका आणि शेजारी अत्याचार करत असल्याचे तिने रडत सांगितले. हे ऐकून सुन्न झालेल्या शिक्षकांनी वेळ न घालवता तातडीने 'चाइल्ड लाईन' आणि शिक्षण विभागाशी संपर्क साधला.
चाइल्ड लाईनच्या पथकाने शाळेचे मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याशी समन्वय साधून पीडितेला पोलीस ठाण्यात आणले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्याध्यापकांनी स्वतः फिर्यादीची भूमिका बजावली. त्यांच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी तिन्ही नराधमांविरुद्ध पोक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत पीडितेचा बाप आणि नराधम शेजाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या प्रकरणातील तिसरा आरोपी असलेला पीडितेचा काका सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.