

Mufti Shamail Nadwi Javed Akhtar Debate: देव आहे की नाही, या प्रश्नावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि तरुण इस्लामिक स्कॉलर मौलाना मुफ्ती शमाइल नदवी यांच्यात झालेली चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका यूट्यूब चॅनलवरील डिबेटमध्ये दोघांमध्ये देवाच्या अस्तित्वावरून वैचारिक संघर्ष पाहायला मिळाला. या चर्चेनंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, जावेद अख्तरांशी वाद घालणारे हे मुफ्ती शमाइल नदवी नेमके कोण आहेत?
या चर्चेत मुफ्ती शमाइल नदवींनी देवाच्या अस्तित्वाच्या बाजूने उदाहरण देत सांगितले की, जसं घड्याळ आपोआप तयार होऊ शकत नाही आणि त्यासाठी घड्याळ बनवणारा लागतो, तसंच इतकं विशाल आणि गुंतागुंतीचं विश्व कोणत्याही निर्मिकाशिवाय निर्माण होऊ शकत नाही. याच मुद्द्यावरून जावेद अख्तर आणि त्यांच्यात वाद झाला.
मौलाना मुफ्ती शमाइल नदवी हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, ते एक इस्लामिक स्कॉलर, वक्ते आणि धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म एका धार्मिक कुटुंबात झाला असून, लहानपणापासूनच धर्म, तत्त्वज्ञान आणि विचारविश्वाकडे त्यांचा कल होता. ते केवळ मौलाना नाहीत, तर तरुणांशी संवाद साधणारे प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
मुफ्ती शमाइल नदवींनी आपली इस्लामिक शिक्षणाची सुरुवात लखनऊ येथील प्रसिद्ध दारुल उलूम नदवतुल उलेमा या संस्थेतून केली. या संस्थेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नदवी’ ही ओळख मिळते. कुराण, हदीस, फिक्ह (इस्लामिक कायदा) आणि इस्लामी तत्त्वज्ञान या विषयांवर त्यांचा अभ्यास आहे. धार्मिक प्रश्नांवर ते शास्त्रीय पद्धतीने भूमिका मांडतात.
मुफ्ती शमाइल नदवी यांची ओळख एक स्पष्टवक्ते अशी आहे. अवघड धार्मिक संकल्पना ते सोप्या भाषेत मांडतात, हीच त्यांची जमेची बाजू आहे. आधुनिक विज्ञान, नास्तिकता, आस्था आणि धर्म यातील संघर्ष यावर ते खुलेपणाने बोलतात. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांचा प्रभाव वाढताना दिसतो.
ते मरकज़-अल-वहयैन या ऑनलाइन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. या माध्यमातून ते इस्लामिक शिक्षण, अभ्यास आणि चर्चा घडवून आणतात. याशिवाय, त्यांनी 2024 मध्ये वहयैन फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली असून, धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये ही संस्था कार्यरत आहे.
मुफ्ती शमाइल नदवी हे पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाहीत. यापूर्वीही आधुनिक समाज, श्रद्धा, नास्तिकता आणि इस्लामशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी मांडलेल्या बेधडक भूमिकांमुळे ते चर्चेत आहेत. मात्र, जावेद अख्तरांसारख्या प्रसिद्ध व्यक्तीशी देवाच्या अस्तित्वावर झालेल्या थेट वादामुळे ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत.