

Virat Kohli Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे शिष्य रसिक दुलारी शरण ऊर्फ दीपक लोदी यांच्या निधनानंतर केलीकुंज आश्रम पुन्हा चर्चेत आलं आहे. याचदरम्यान श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष फलाहारी महाराज यांनी विराट कोहली आणि प्रेमानंद महाराज यांच्याबाबत काही दावे केले होते. या दाव्यांवर आता विराट कोहलीच्या टीमकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हे गेल्या काही काळापासून प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी जात आहेत. फलाहारी महाराजांनी दावा केला होता की, विराट कोहलीला 5 कोटी रुपये देऊन प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते. तसेच, यामागे एका कंपनीचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
या आरोपांवर विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फलाहारी महाराजांचे सर्व दावे खोटे आणि आधारहीन असल्याचे म्हटले आहे.
विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विराट कोहली प्रेमानंद महाराजांकडे केवळ त्यांच्याविषयी असलेल्या श्रद्धा आणि आदरामुळे जातो. त्यामुळे त्याला पैसे देऊन दर्शनासाठी आणल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवक्त्यांनी पुढे म्हटले की, फलाहारी महाराजांनी विराट कोहलीबाबत केलेले दावे तथ्यहीन आहेत. या दाव्यांचा आम्ही ठामपणे निषेध करतो. माध्यमांनी अशा प्रकारच्या दाव्यांची सत्यता तपासल्यानंतरच ते प्रसिद्ध करावेत आणि जबाबदारीने बातमीदारी करावी, असे आवाहनही विराटच्या टीमने केले आहे.
फलाहारी महाराजांनी दावा केला होता की, राजस्थानमधील एका कंपनीने विराट कोहलीला 5 कोटी रुपये देऊन प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आणले होते. त्यानंतर या कंपनीशी संबंधित काही लोक संतांच्या वेशात केलीकुंज आश्रमात दाखल झाले असून ते प्रॉपर्टीशी संबंधित काम करत असल्याचाही दावा त्यांनी केला.
याशिवाय फलाहारी महाराजांनी प्रेमानंद महाराजांच्या आरोग्याबाबतही भाष्य केले. प्रेमानंद महाराज हिंदू आणि सनातन धर्मासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या आरोग्यासाठी आपण आपली किडनी देण्यासही तयार असल्याचे फलाहारी महाराजांनी सांगितले.
मात्र, त्याचवेळी प्रेमानंद महाराजांनी काही लोकांपासून आणि कथित माफियांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. काही लोक प्रेमानंद महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रेमानंद महाराजांनी गोवर्धन गिरिराज येथे यावे, असे आवाहन फलाहारी महाराजांनी केले.
दरम्यान, या सर्व दाव्यांमध्ये विराट कोहलीचे नाव आल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं. मात्र, विराट कोहलीच्या टीमने आता स्पष्ट भूमिका घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीची प्रेमानंद महाराजांवरील श्रद्धा ही वैयक्तिक आहे आणि त्यांच्या भेटीमागे कोणताही आर्थिक व्यवहार नाही.