

SpaceX Starship Catch
नवी दिल्ली: एलॉन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' कंपनीने एका अंतराळयानाला हवेत यशस्वीपणे पकडले. शनिवारी अंतराळातून पृथ्वीवर परतणारे ‘स्टारशिप’ हे अवकाशयान प्रथमच हवेतच पकडण्यात यश आले. पूर्णपणे पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेट प्रणालीच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल मानले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अंतराळ मोहिमांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना प्रचंड उष्णतेचा सामना केल्यानंतर स्टारशिप ढगांमधून खाली आले. त्यानंतर हे अवकाशयान हळूहळू टेक्सासमधील स्टारबेसच्या दिशेने खाली आले. लॉन्च पॅड क्रमांक दोनवर ते अलगद पकडण्यात आले. विशेष म्हणजे, कोणत्याही पारंपरिक लँडिंग पद्धतीचा वापर न करता अवकाशयान थेट हवेतच पकडण्यात आले.
अंतराळ उद्योगासाठी हा अनेक दशकांपासून पाहिल्या जाणाऱ्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. पूर्णपणे पुनर्वापर करता येणारी रॉकेट प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यापुढे प्रत्येक मोहिमेसाठी नवीन रॉकेट तयार करण्याची गरज कमी होईल. परिणामी, अंतराळात वारंवार मोहिमा राबवणे अधिक सोपे आणि कमी खर्चिक होऊ शकते.
स्पेसएक्सचे प्रवक्ते डॅन ह्युओट म्हणाले की, "प्रचंड उष्णतेतून प्रवास करून परतणाऱ्या अवकाशयानाला स्टीलच्या यांत्रिक संरचनेच्या मदतीने हवेतच पकडणे, हे आमचे सर्वात मोठे उद्दिष्ट होते. आम्ही स्टारशिपला यशस्वीपणे पकडले आहे. यामुळे आता अनेक गोष्टी बदलतील."
यापूर्वी स्पेसएक्सने पृथ्वीवर परतणारे बूस्टर रॉकेट तीन वेळा यशस्वीपणे पकडले होते. मात्र, स्टारशिपला हवेतच पकडणे हे त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक होते. कारण बूस्टर रॉकेटच्या तुलनेत स्टारशिप अधिक उंचीवरून आणि प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने परतत होते. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी अत्यंत अचूक तंत्रज्ञान आणि नियंत्रणाची आवश्यकता होती.