Sonia Gandhi Autobiography: 'ते माझ्याशी नजर मिळवणंही टाळतात...', सोनिया गांधींचा पुस्तकातून मोठा खुलासा! PM मोदींबद्दल काय लिहिलंय?

Sonia Gandhi Book on PM Modi: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनेक दावे केले आहेत.
Sonia Gandhi Book on PM Modi
Sonia Gandhi Book on PM ModiPudhari
Published on: 
Updated on: 

Sonia Gandhi Book on PM Modi: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नव्या आत्मचरित्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राजकीय विचारधारेबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत.

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आजपर्यंत आपला कोणताही वैयक्तिक संवाद झालेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. संसदेत किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोघांची भेट झाली, तरी मोदी आपल्याशी नजर मिळवणे टाळतात, असेही सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे. हार्परकॉलिन्स इंडिया या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी बाजारात आले आहे.

मोदी आणि माझ्यात कधीही मोकळेपणाने संवाद झाला नाही

सोनिया गांधी यांनी पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटींचा अनुभव सांगितला आहे. नरेंद्र मोदी १२ वर्षांहून अधिक काळ देशाचे पंतप्रधान आहेत. ते तिसऱ्यांदा या पदावर विराजमान झाले आहेत. मात्र, एवढ्या वर्षांत त्यांच्याशी आपला कधीही संवाद झाला नसल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या दालनात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येतात. अशा वेळी आपली आणि मोदींची भेट होते, असे त्यांनी सांगितले आहे. हे दालन लहान असल्याने तिथे अनेक नेते उपस्थित असतात. अशा प्रसंगी मोदी आणि आपण एकमेकांना औपचारिकपणे नमस्कार करतो. मात्र, त्यापलीकडे कोणताही संवाद होत नाही, असे सोनिया गांधी यांनी लिहिले आहे.

यापूर्वी वेगवेगळ्या विचारांचे नेतेही एकमेकांशी सौहार्दाने वागत असत. मात्र, आता राजकीय वातावरण बदलल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मोदी आपल्याकडे पाहणे टाळतात आणि नजर मिळवत नाहीत, असेही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी आणखी एक अनुभव सांगितला आहे. रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर पंतप्रधान मोदी कधीकधी त्यांची विचारपूस करत असत. 'तुम्ही आता ठीक आहात ना?' असे ते विचारत. त्यावर 'हो, आता मी ठीक आहे. धन्यवाद,' असे उत्तर आपण देत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. याशिवाय वाढदिवस आणि नववर्षाच्या औपचारिक शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. मात्र, त्यांच्यात कधीही सविस्तर चर्चा झाली नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

मोदींचा आणि माझा दृष्टिकोन वेगळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्यामध्ये केवळ राजकीयच नव्हे, तर वैचारिक मतभेदही असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. भारताकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताबद्दलची आपली समज कुटुंबातील सदस्यांकडून आणि त्यांच्या सामाजिक कार्यातून तयार झाली. विविध जाती, संस्कृती, भाषा आणि धर्मांचे लोक एकत्र राहतात, असा भारताचा विचार आपल्या मनात रुजल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्येकाला समान स्वातंत्र्य आणि समान हक्क मिळायला हवेत, या विचारावर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांमधून आणि त्यांच्या बालपणीच्या अनुभवांमधून तयार झाल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, या विचारसरणीत स्वतःचा धर्म आणि संस्कृती इतरांपेक्षा श्रेष्ठ मानण्याची प्रवृत्ती दिसून येते. समाजात ठरावीक व्यवस्था, श्रेणी आणि नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

'ते त्यांच्या भारताच्या संकल्पनेसाठी लढत आहेत आणि मी माझ्या भारताच्या संकल्पनेसाठी लढत आहे. माझा भारत हा कोणत्याही एका विचारसरणीचे वर्चस्व न मानणारा आहे. तो सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायासाठी उभा राहणारा भारत आहे,' अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली आहे.

मोदींच्या राजकीय प्रवासावरही सोनिया गांधींचे भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणातील वाटचाल आणि त्यांची सामाजिक पार्श्वभूमी यावरही सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. मोदी यांचा राजकारणातील प्रवास आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील राजकीय आणि सत्ताधारी वर्गाबद्दल मोदी यांनी व्यक्त केलेली नाराजी आपल्याला काही प्रमाणात समजू शकते, असेही सोनिया गांधी यांनी नमूद केले आहे. दिल्लीतील उच्चभ्रू लोकांच्या बैठकींमध्ये होणाऱ्या राजकीय चर्चा अनेकदा सामान्य भारतीयांच्या वास्तवापासून दूर असतात. त्यामुळे अशा चर्चांमध्ये आपल्यालाही अनेकदा अस्वस्थ वाटत असे, असे त्यांनी लिहिले आहे.

Sonia Gandhi Book on PM Modi
Narendra Modi Gujarat Visit : PM मोदींच्या दौऱ्यावेळी दिव्याखालील 'अंधार' भोवला..! पालिका कर्मचारी 'थेट सस्पेंड'!

आपल्या मतदारसंघात आणि देशातील वेगवेगळ्या भागांत फिरताना सामान्य नागरिकांचे प्रश्न, त्यांचे संघर्ष आणि जगण्यासाठी करावी लागणारी धडपड आपण जवळून पाहिली. मात्र, सत्ताधारी आणि विशेषाधिकार मिळालेल्या वर्गाला या वास्तवाची कल्पनाही करणे कठीण जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

मोदी यांची राजकीय सुरुवात त्यांच्या यंत्रणेकडून दाखवली जाते तितकी साधी नसावी, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मात्र, सामान्य परिस्थितीतून पुढे येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सत्ता आणि प्रभाव मिळवण्यासाठी मोदी यांनी निश्चितच मेहनत घेतली, असेही त्यांनी मान्य केले आहे.

संसदेत मोदींच्या भाषणांवरही टीका

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषण करण्याच्या पद्धतीवर सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसदेत बोलताना मोदी अनेकदा सार्वजनिक सभांमधील आक्रमक भाषेचाच वापर करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

विरोधकांची खिल्ली उडवणे आणि त्यांच्यावर टीका करणे, यावर मोदी यांच्या भाषणांचा अधिक भर असतो, असे सोनिया गांधी यांचे मत आहे.

तसेच, भाजपकडून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वारंवार लक्ष्य केले जाते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. नेहरू यांनी भारताला लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात असल्याचे सोनिया गांधी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

'काँग्रेसमुक्त भारत' या घोषणेमागे RSSची विचारसरणी

भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' या घोषणेवरही सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. भाजपला केवळ काँग्रेस पक्ष संपवायचा नाही, तर काँग्रेसची विचारसरणी आणि धोरणेही संपवायची आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव भाजपच्या राजकारणावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसबद्दल पंतप्रधान मोदी यांच्या मनात असलेला विरोध हा संघाकडून मिळालेल्या वैचारिक प्रशिक्षणाचा परिणाम असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

संघ परिवाराशी संबंधित संकेतस्थळांवर जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा आणि चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Sonia Gandhi Book on PM Modi
Gokul Milk Union President Election Results LIVE: गोकुळ अध्यक्षपदासाठी समविचारी आघाडीचा उमेदवार मैदानात

हिंदू धर्मातील विविध परंपरांचा सोनिया गांधींकडून उल्लेख

सोनिया गांधी यांनी पुस्तकात हिंदू धर्मातील विविध परंपरा आणि विचारांचाही उल्लेख केला आहे. त्यांची सासू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना भारतीय धार्मिक परंपरांची ओळख करून दिली होती, असे त्यांनी सांगितले आहे.

भारतात शतकानुशतके वेगवेगळ्या श्रद्धा आणि परंपरांचे लोक एकत्र राहत आले आहेत. या परंपरेत अनेक देवता, विचार आणि श्रद्धांना स्थान आहे. कोणत्याही एका देवतेला, धर्मग्रंथाला किंवा विचाराला मानणे बंधनकारक नाही. वेगवेगळ्या मतांना आणि विचारांना स्वीकारण्याची क्षमता भारतीय परंपरेत आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांतून आपल्याला अहिंसा आणि धर्माची शिकवण मिळाली.

याचबरोबर हिंदू समाजातील जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता आणि अन्याय यांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. समाजसुधारकांनी हिंदू धर्मातील विचारांच्या आधारेच जातिव्यवस्थेतील अन्यायाला आव्हान दिले, असे त्यांनी नमूद केले आहे.

आत्मचरित्रामुळे राजकीय चर्चेला उधाण

सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासासोबतच देशाच्या विचारधारेबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले औपचारिक संबंध, त्यांच्यातील वैचारिक मतभेद, RSSची विचारसरणी आणि काँग्रेस-भाजपमधील राजकीय संघर्ष यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. त्यामुळे या पुस्तकातील विधानांवर आगामी काळात राजकीय वर्तुळात आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.