

PM Modi Gujarat Visit Streetlight Issue Official Suspended : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यावेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या वडोदरा जिल्ह्यातील डभोई नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवास केलेल्यामार्गावरील १२ पथदिवे बंद होते. नगरपालिकेच्या सूचना असूनही पथदिव्यांची देखभाल न केल्याचाठपका नगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखांनी प्रभारी लिपिक महेश वसावा यांच्यावर ठेवला आहे.
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (एकता नगर) येथे ३१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय एकता दिन' सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर मान्यवर हेलिकॉप्टरने वडोदरा विमानतळावर जाणार होते. मात्र, संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे सुमारे ९० किमीचा प्रवास करून वडोदरा विमानतळ गाठले.
वडोदराला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडणारा महामार्ग डभोईमधून जातो आणि शहरातील अनेक प्रमुख रस्ते या मार्गाशी जोडलेले आहेत. सिहोर चौकडीपासून भोगोल परिसर आणि सरिता पुलापर्यंतच्या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याने प्रवास केलेल्या मार्गावरील १२ पथदिवे बंद असल्याचे आणि काही दिवे मिणमिणत असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी डभोई नगरपालिकेने कारवाई करत प्रकाशयोजना विभागाचे प्रभारी लिपिक महेश वसावा यांना सहा दिवसांसाठी निलंबित केले आहे.
नगरपालिकेच्या स्पष्ट सूचना असतानाही पथदिव्यांच्या देखभालीबाबत कसूर केल्याप्रकरणी प्रशासकीय प्रमुखांनी हे निलंबन पत्र जारी केले आहे. गुजरात नगर पालिका कायदा, १९६३ च्या कलम ४८ अंतर्गत ३१ ऑक्टोबर रोजी हे निलंबन आदेश जारी करण्यात आले आहेत.
डभोई नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विराज शाह यांनी जारी केलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, व्हीआयपींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने स्वच्छता, मोकाट जनावरांचे नियंत्रण आणि पथदिव्यांची देखभाल यांसारख्या विविध जबाबदाऱ्या वेगवेगळ्या विभागांना दिल्या होत्या. प्रकाशयोजना विभागाचे प्रभारी लिपिक म्हणून पथदिवे सुरळीत सुरू ठेवणे ही वसावा यांच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांपैकी एक होती. आदेशात नमूद केल्यानुसार, वारंवार सूचना देऊनही त्यांनी वेळेत आवश्यक दुरुस्ती करून घेतली नाही. त्यामुळे गुजरात नगर पालिका कायदा, १९६३ च्या कलम ४८ अन्वये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
महेश वसावा यांना ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सक्षम प्राधिकाऱ्यांसमोर वैयक्तिक सुनावणीसाठी उपस्थित राहून सोपवलेल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, वसावा यांच्याविरुद्ध यापूर्वीही वारंवार तक्रारी आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार आणि जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या आहेत.