
Gokul Milk Union President Election Results LIVE : कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडत आहे. या निवडणुकीत शशिकांत पाटील आणि रणजीतसिंह पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.
दरम्यान, मतदानापूर्वीच चार अतिरिक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून कायदेशीर वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या या चार संचालकांना मतदान करता येणार की नाही, हा प्रश्न न्यायालयात पोहोचला. अखेर औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला आहे.
उच्च न्यायालयाने नेमका काय दिला आदेश?
दिवाळीच्या सुट्टीत न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्यासमोर या प्रकरणाची तातडीने सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चार अतिरिक्त संचालकांच्या मतदानाचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे.
मात्र, त्यांच्या मतदानाबाबत न्यायालयाने महत्त्वाची अट घातली आहे. या चारही संचालकांना मतदान करता येईल. पण त्यांनी दिलेली मते इतर मतांपासून वेगळी ठेवावी लागतील. त्यासाठी स्वतंत्र मतपेटी ठेवून ती सीलबंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.