

Sonam Wangchuk hunger strike : प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने सरकारी रुग्णालय सफदरजंगमध्ये ठेवण्यात आले आहे. "सरकारी रुग्णालयावर आमचा अजिबात विश्वास उरलेला नाही. वांगचुक यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे," अशी मागणी करणारी याचिका सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच या याचिकेवर आजच तत्काळ सुनावणी घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, जंतरमंतर येथे शांततापूर्ण उपोषणाच्या २१ व्या दिवशी असलेल्या वांगचुक यांना "वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली बेकायदेशीरपणे आणि कायद्याचे उल्लंघन करून डांबून ठेवण्यात आले आहे." सफदरजंग रुग्णालयातील त्यांची ही सततची कोंडी बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राज्यघटनेच्या कलम १९ व २१ चे उल्लंघन करणारी असल्याचे घोषित करण्याची मागणी यात केली आहे.
वांगचुक यांना वकील किंवा गेल्या २० दिवसांपासून त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधू न देता एकांतात ठेवण्यात आले आहे, असा आरोप करत त्यांची त्वरित सुटका किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये अंगमो यांनी म्हटले आहे की, सफदरजंग रुग्णालयावरील त्यांचा "विश्वास उडाला" आहे. त्यांनी वांगचुक यांच्या पोटॅशियम पातळीबाबत रुग्णालयाच्या मूल्यांकनात विसंगती असल्याचा आरोप केला. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सांगितले होते की पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत खाली आली आहे आणि ती जीवघेणी स्थिती आहे; मात्र रुग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये नेमका आकडा न देता केवळ "पोटॅशियमची पातळी कमी होत आहे" असे नमूद करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
अंगमो यांनी पुढे असा दावा केला की, सुमारे १० तास आणि वारंवार विनंत्या केल्यानंतर, रात्री १०.३० च्या सुमारास कुटुंबाला वांगचुक यांचा रक्ताचा नमुना घेण्याची परवानगी मिळाली. एका स्वतंत्र प्रयोगशाळेतील चाचणीत त्यांची पोटॅशियम पातळी ३.५ असल्याचे आढळले, जी सामान्य श्रेणीत आहे. वारंवार विनंती करूनही रुग्णालयाने वांगचुक यांना डिस्चार्ज देण्यास किंवा कुटुंबाच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यास नकार दिला, असा आरोपही त्यांनी केला.
अंगमो यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाच्या त्या मजल्यावर सुमारे ३० पोलीस कर्मचारी तैनात होते आणि संपूर्ण रुग्णालयात १०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते, ज्यामुळे कुटुंबाच्या हालचालींवर कडक निर्बंध आले होते. "ही वैद्यकीय सेवा नाही, तर ही बेकायदेशीर स्थानबद्धता आहे." वांगचुक यांना काही झाले, तर "रुग्णालय प्रशासन आणि सरकार यांनी त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे." वांगचुक यांची प्रकृती अधिक खालावण्यापूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची तातडीची परवानगी मिळवण्यासाठी आपण दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
दीर्घकाळ उपवास आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे (डिहायड्रेशन) सोनम वांगचुक अशक्त झाले होते, परंतु त्यांची प्रकृती स्थिर होती आणि त्यांना सतत वैद्यकीय देखरेखीची गरज होती, असे रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी सांगितले होते.