

Sonam Wangchuk hunger strike : प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी आज (दि.२९) सोमवारपासून येथील जंतरमंतरवर 'सीजेपी' (CJP) आंदोलनादरम्यान आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या मार्गावर आपल्याला पुन्हा कधीच परतावे लागू नये, अशी आशा होती; परंतु लडाखच्या जनतेला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याने आणि केंद्र सरकारसोबतची चर्चा ठप्प झाल्याने आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही, असे वांगचूक यांनी स्पष्ट केले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत वांगचुक यांनी म्हटलं आहे की, "माझा अजूनही चर्चेवर पूर्ण विश्वास आहे. या उपोषणामुळे सरकारसोबतची थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होईल, अशी आशा आहे. मला पुन्हा आंदोलनाला बसावे लागेल असे वाटले नव्हते. पुन्हा उपोषणाला बसावे लागत असल्याबद्दल मला खेद वाटतोय. मी हे आनंदाने करत नाहीये आणि हे सोपेही नाही. यात माझा जीवही जाऊ शकतो, पण जीव गेला तरी मी आता पाऊल मागे घेणार नाही," असा निर्धार सोनम वांगचूक यांनी व्यक्त केला.
लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर तेथे घटनात्मक संरक्षण, राज्याचा दर्जा आणि संसदेत अधिक राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी गेल्या काही काळापासून मोठे आंदोलन सुरू आहे. संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत लडाखचा समावेश करणे ही तेथील नागरिक आणि संघटनांची मुख्य मागणी आहे.
सप्टेंबर २०२५ मधील लडाख आंदोलनादरम्यान वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांची सुटका झाली. या अटकेच्या काळातील आणि सुटकेनंतरच्या घडामोडींचा संदर्भ देत ते म्हणाले, "मी तुरुंगात असताना ४ फेब्रुवारी रोजी झालेली एक बैठक जवळपास अयशस्वी ठरली होती. त्यानंतर माझ्या सुटकेनंतर २२ मे रोजी आणखी एक बैठक झाली. या बैठकीकडून मला खूप अपेक्षा होत्या, कारण विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि चर्चा पुढे नेण्यासाठीच माझी सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते."
२२ मे रोजी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली, तरी त्या बैठकीतील निष्कर्षांना अधिकृतपणे कागदावर आणण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप वांगचूक यांनी केला. "लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची ही एक चांगली संधी होती. परंतु, एक पाऊल पुढे आणि दोन पावले मागे घेण्याच्या सरकारच्या या भूमिकेमुळे लोकांचा विश्वास उडाला आहे. २०१३-१४ मध्ये लेखी आश्वासन देऊनही सरकारने शब्द फिरवला, त्यामुळे आधीच विश्वासाची कमतरता होती," असे त्यांनी नमूद केले.
असे असले तरी संवादावरील विश्वास अद्याप पूर्णपणे तुटलेला नाही, असे सांगत ते म्हणाले, "मला अजूनही आशा आहे, म्हणूनच मी इथे लढतोय. सरकारचा विवेक जागा होईल आणि ते आपल्या लेखी आश्वासनांची पूर्तता करतील, अशी अपेक्षा आहे." लोकशाही सरकारांनी जनतेच्या समस्यांकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे, आंदोलनांकडे धोका म्हणून बघू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. "जर आपण भारताला लोकशाही मानतो, तर सरकारची भूमिका अशी असू शकत नाही. जर हुकूमशाही असेल तर कठोर भूमिका समजून घेता येईल, पण मग स्वतःला लोकशाही म्हणवणे बंद करा," अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले.
या आंदोलना उत्तरदायित्व असायला हवे, असे सांगत वांगचूक यांनी आगामी संसद अधिवेशनात या मुद्द्यावर सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. तसेच सर्व राजकीय पक्षांना या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, "हा केवळ राजकारणाचा भाग नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. देशातील जनता अजूनही आपला आवाज उठवत आहे, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे."
आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत ते म्हणाले, "मनात कोणतीही भीती किंवा द्वेष ठेवू नका. आपले म्हणणे शांततेच्या मार्गाने मांडा. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा राहील आणि देश पाठीशी असेल तर कोणतेही सरकार तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकणार नाही." स्वतःच्या अटकेचा अनुभव सांगताना ते तरुणांना म्हणाले की, "तुरुंगाला घाबरू नका, तो तुम्हाला अधिक मजबूत करेल. न्यायासाठी लढा सुरूच ठेवा," असे आवाहनही वांगचूक यांनी केले आहे.