

Abhijeet Dipke Narendra Modi Resignation: जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सोनम वांगचुक यांना दिल्ली सरकारच्या सफदरजंग रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. ते शुद्धीवर असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आणि माध्यमांशी संवाद साधताना आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
दीपके म्हणाले, "सोनम सरांना आंदोलनस्थळावरून हटवले म्हणजे आंदोलन संपेल, असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा आहे. आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असून 20 जुलै रोजी संसदेकडे नियोजित मोर्चा काढणार आहोत."
याचवेळी त्यांनी आंदोलनाच्या मागण्यांबाबतही मोठे वक्तव्य केले. "आतापर्यंत आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो. मात्र, या कारवाईनंतर आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी करू," असा दावा अभिजीत दीपके यांनी केला.
सोनम वांगचुक हे 28 जूनपासून उपोषणावर असून, NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून, या घडामोडींमुळे आंदोलनाला नवे राजकीय वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.