

Nasrapur Case Update
नागपूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला यमसदनी पाठवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. अशा गुन्हेगारांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मलाही वाटते; मात्र लोकशाही कायद्याने चालते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार 'रेकॉर्ड ब्रेक' वेगाने हा खटला चालवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, "मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी संवाद साधला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि तो रास्तच आहे. अशा नराधमांना कठोर शासन व्हावे हीच सरकारची भूमिका आहे. कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये किंवा तांत्रिक त्रुटीचा फायदा मिळू नये, या दृष्टीने सरकार भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडेल. या प्रकरणाचा खटला अत्यंत वेगाने चालवला जाईल."
पीडित कुटुंबाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने पीडित कुटुंबाला एक लेखी पत्रही देण्यात आले आहे.
घटनेच्या ठिकाणी काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, "काही लोक पीडितेच्या वडिलांनाही अडवण्याचा प्रयत्न करत होते, ते कोण आहेत हे आम्हाला समजले आहे. मात्र, मुलीच्या वडिलांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जी भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकरणातील आरोपीवर २०१९ मध्येही एक गुन्हा दाखल झाला होता, मात्र पुराव्याअभावी तो सुटला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "त्यावेळी तपासात काही उणिवा (Lapses) राहिल्या होत्या का, याची चौकशी केली जाईल. तसेच त्याचे जुने गुन्हे शोधून काढून यावेळेस तो कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे."
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावरही कडाडून टीका केली. महिला आरक्षण विधेयकावर बोलण्याचा राहुल गांधींना कोणताही अधिकार नाही, असे फडणवीस म्हणाले. "भारतात पहिल्यांदा जेव्हा महिलांना लोकसभा आणि विधानसभेत संधी मिळत होती, तेव्हा काँग्रेसने आपल्या संख्याबळाच्या जोरावर त्याला विरोध केला. काँग्रेसने महिला आरक्षणाविरोधात नेहमीच प्रतिगामी निर्णय घेतले आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला.