

डॉ. सुकृत खांडेकर
उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'त स्वत:ला बांधून घेतले आहे, ते घराबाहेर पडत नाहीत किंवा त्यांची भेट मिळणे खूप कठीण असते, असे सर्वच बोलतात, ते कथानक आहे असे समजायचे का? खासदार, आमदार किंवा नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी पक्षप्रमुख म्हणून नियमित संवाद नाही. पक्षात, शाखा-शाखांवर, रस्त्यावर किंवा तळागाळात काय चालले आहे, याची त्यांना कल्पना येत नाही.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फुटत नाही, पक्ष भक्कम आहे, अभेद्य आहे असे उबाठा सेनेचे प्रवक्ते गेले दोन महिने सांगत होते; पण संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), संजय जाधव (परभणी), नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि संजय दिना पाटील (इशान्य मुंबई) हे पक्षाचे सहा खासदार १६ जून रोजी रात्री चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचले तेव्हा 'मातोश्री'चे डोळे उघडले. यापैकी काही जणांनी 'मातोश्री'वर येऊन व काहींनी मोबाईल फोनवर आपल्या आई-बहिणीची, पत्नी- मुलांची, साईबाबांची आणि आई तुळजाभवानीची शपथ घेऊन आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, अशा चार दिवस अगोदरच शपथा घेतल्या होत्या. युद्धात, प्रेमात आणि राजकारणात अशा घेतलेल्या शपथांचे काय होते, याचा अनुभव पुन्हा एकदा 'मातोश्री'ला आला. या सर्व सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होत असल्याचे कळवले आणि लगेचच उबाठा सेनेच्या नेत्यांचा व प्रवक्त्यांचा थयथयाट सुरू झाला. २०२४ मध्ये पक्षाच्या निवडून आलेल्या नऊपैकी सहा खासदारांनी ठाकरे सेनेला 'जय महाराष्ट्र' केला. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी धनुष्यबाण हाती घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, आगामी काळात महाराष्ट्रात एकच शिवसेना असेल, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. सध्या तेच घडत आहे. एकनाथ शिंदे यांनीही 'ऑपरेशन टायगर' संपलेले नाही. उबाठा सेनेतील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत, असे म्हटले आहे. उबाठा सेनेतील सारे (मोजके अपवाद वगळता) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असे शिंदे गटाचे नेते ठामपणे सांगत आहेत.
ठाकरे सेनेतील सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सेनेचे आमदार व नगरसेवक आपल्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत. एकीकडून शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरेंच्या आमदार व नगरसेवकांवर मानसिक दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेतील आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना स्वत:च्या भविष्याविषयी समजेनासे झाले आहे. उबाठा सेना नजीकच्या काळात सत्तेवर येण्याची शक्यता नाही आणि विरोधी पक्षात राहून मानसन्मान मिळत नाही व कोणतीच कामे होत नाहीत, अशी भावना बळावत आहे. शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी म्हटले आहे की, ठाकरे सेनेतील ९९.९९ टक्के लोक आमच्या पक्षात सामील होतील व तिकडे फक्त 'हम दो, हमारे दो' राहतील.
शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. पक्षाच्या वतीने फारसे कुठे कार्यक्रमही होत नाहीत. उबाठा सेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या तोंडावरच पक्ष पुन्हा एकदा फुटला. लोकसभेतील सहा खासदार दुसऱ्या पक्षात निघून जाणे ही काही क्षुल्लक गोष्ट नव्हे; पण त्याचे महत्त्व एकनाथ शिंदे व भाजपला चांगले ठाऊक आहे. शिवसेनेकडे लोकसभेत आता केवळ अरविंद सावंत, अनिल देसाई व राजाभाऊ वाजे असे तीनच खासदार उरले आहेत. त्यातला एक म्हणे सीमोल्लंघनासाठी योग्य संधीची वाट पाहत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले. आता त्यांच्या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या तेरा झाली आहे.
शिवसेनाप्रमुखांनी घाम गाळून शिवसेना नावाचे साम्राज्य उभारले, ते आता अस्ताला जाणार की काय, अशा घडामोडी घडत आहेत. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंडाचा झेंडा फडकावला. त्याचा परिणाम उद्धव यांना मुख्यमंत्रिपद आणि सत्ता गमावावी लागली. ज्यांनी बंड केले, त्यांना ठाकरे सेनेने गद्दार, खंजीर , रेडे म्हणून हिणवले. 'पन्नास खोके, एकदम ओके' अशा घोषणा दिल्या. शिंदे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले, साठ आमदार, सात खासदार निवडून आणले. पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. आता त्यांनीच उबाठाचे जून २०२६ मधे सहा खासदार आपल्यासोबत नेले. त्यांचे भाजपात महत्त्व वाढले. नुकसान कोणाचे झाले? उद्धव ठाकरे, त्यांच्या पक्षाचे व 'मातोश्री'चे. २०२२ चे बंड उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकाखाली झाले. 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा गेले चार महिने चालू होती; पण उद्धव यांनी काहीच बोध घेतला नाही. जाणाऱ्यांना रोखले नाही, त्यांना समजावले नाही. त्यांचे प्रवक्ते त्यांना गद्दार म्हणतात, पन्नास कोटी, ऑपरेशन तुडवा अशी भाषा वापरतात, त्यातून वातावरण सुधारते की बिघडते? भाजपचा शत्रू नंबर एक असलेल्या काँग्रेसबरोबर सलोखा करून मुख्यमंत्रिपदाचा मुकुट चढवला तेव्हाच उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष भाजपच्या रडारवर आला, हे त्यांना समजले नाही, असे कसे म्हणता येईल?
उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'त स्वत:ला बांधून घेतले आहे, ते घराबाहेर पडत नाहीत किंवा त्यांची भेट मिळणे खूप कठीण असते, असे सर्वच बोलतात, ते कथानक आहे असे समजायचे का? खासदार, आमदार किंवा नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी पक्षप्रमुख म्हणून नियमित संवाद नाही. पक्षात, शाखा-शाखांवर, रस्त्यावर किंवा तळागाळात काय चालले आहे, याची त्यांना कल्पना येत नाही. मुंबई- ठाणे हा पक्षाचा गड आहे; पण ते स्वत: फिरत नाहीत. ते खूप कामात आहेत, तर त्यांचे चिरंजीव, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पक्ष कार्याला वाहून घेतले आहे, असे कुठे दिसत नाही. पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवन किंवा शिवालयात तरी ठाकरे कुठे नेहमी दिसतात? स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने रस घेतला नाही. मुख्यमंत्री असताना व नंतरच्या काळातही पक्ष नेतृत्वाने संघटना बांधणीकडे लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम निवडणुकीत भोगावा लागतो. विभागप्रमुख आपली जागा सोडत नाहीत. अनेक शाखा ओस पडल्यात. निवडून आलेले खासदार पक्ष सोडून जात असतील, त्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे वाटते का? केवळ पक्षाच्या मुखपत्रातून रोज भाजप-शिवसेनेवर टीकेची झोड उठवली म्हणजे पक्षाला ताकद मिळेल किंवा पक्ष लोकांपर्यंत पोहोचेल असे गणित असेल, तर निवडणुकीत भरघोस यश का मिळत नाही?
गेल्या पंधरा-वीस वर्षांत पक्षातील अनेक कर्तृत्ववान नेत्यांचे पंख कापले गेले. नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक, वानखेडे स्टेडियम उखडून पक्षाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे शिशिर शिंदे अशा अनेक दिग्गजांची नावे सांगता येतील की, ते पक्षापासून का दूर झाले? शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत आक्रमक व लढाऊ असलेली शिवसेना मवाळ झाली. शिवसेनाप्रमुखांच्या काळात पक्षनेतृत्वाचा असलेला वचक, दबदबा, दरारा आता राहिला नाही. रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी शिवसैनिक बाहेर पडत नाहीत, आंदोलने केली, तर पक्ष पाठीशी राहील, याची सैनिकांना शाश्वती नाही. एकीकडे 'मातोश्री'चे दरवाजे सर्वसामान्य जनतेला बंद असतात आणि दुसरीकडे नंदनवनचे दरवाजे मध्यरात्रीनंतरही सर्वांसाठी खुले असतात. म्हणूनच शिंदे यांच्या शिवसेनेकडे प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत.
उबाठा सेनेतील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबईत एका कार्यक्रमात अधिकृत प्रवेश केल्यानंतर दोन-चार दिवस वातावरण तापले होते. उबाठा सेनेतील नेत्यांनी फुटीर खासदारांना रस्त्यावरून फिरू देणार नाही, असी धमकी दिली. तुम्ही 'ऑपरेशन टायगर' केलेत आता बाळासाहेबांचे शिवसैनिक 'ऑपरेशन तुडवा' सुरू करतील, अशीही घोषणा केली. काही फुटीर खासदारांच्या मतदारसंघांत उबाठा सेनेच्या शंभर-दोनशे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले. ज्यांनी पक्षांतर केले त्यांच्या मोटारी अडविण्याचा प्रयत्न केला. गद्दार म्हणून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. इशान्य मुंबईतून लोकसभेवर निवडून आलेले उबाठाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडूप येथील निवासस्थानासमोर हजारभर उबाठाच्या सैनिकांनी घोषणा दिल्या. स्वत: उद्धव ठाकरे यांनी तिथे येऊन संताप प्रकट केला. संजय दिना पाटील यांचे वडील हे काँग्रेस पक्षात मोठे नेते होते. संजय हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना असा राजकीय प्रवास करीत आता शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. ते तीन वेळा आमदार व दोन वेळा खासदार झालेत. खासदार संजय राऊतही भांडूप येथेच राहतात. संजय राऊत हे रोज फुटीर खासदारांना धमक्या देत एकनाथ शिंदे व अमित शहांवर टीका करीत असतात. जेव्हा उबाठाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांना धमक्या दिल्या तेव्हा संजय दिना पाटील खूप संतापले. ते म्हणाले, 'माझ्या नादाला लागाल, तर हॉस्पिटल किंवा स्मशानात जाल. सामान्य कार्यकर्त्यांशी माझे वैमनस्य नाही. कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबीयांकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांनी अगोदर स्वत:चा मेडिक्लेम वा लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. मला पोलीस सुरक्षेची गरज नाही. पोलीस नसले, तरी आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. माझे वडील हयात असताना त्यांच्यावर हल्ला करायला आले तेव्हा आम्ही पाच लोक मारले होते…'
'आम्ही कोणा भाई लोकांच्या जीवावर नाही, तर आम्ही स्वत:च्या जीवावर लढणारे आहोत, घरात घुसून मारू, तुम्ही कितीही सुरक्षा ठेवा, मी थेट बॉम्ब टाकेन…' असाही निर्वाणीचा इशारा संजय दिना पाटील यांनी दिला आहे. 'ऑपरेशन टायगर'मध्ये बाधा आणली गेली, तर कोणत्या थराला काय होऊ शकते, याची ही झलक आहे. सहा खासदारांनी पक्ष प्रवेश केल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, 'ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…'
उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून पक्ष संघटना टिकवणे हे मोठे आव्हान आहे. एकनाथ शिंदे व भाजप यांच्या माऱ्याला तोंड देणे खूप कठीण झाले आहे. पदावरून पायउतार होण्याची उद्धव यांनी यापूर्वीही भाषा केली होती. वर्धापन दिनाला त्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पक्षातील वाढता असंतोष व बंडखोरीनंतर एकदा ते म्हणाले,
'मित्र कोण, शत्रू कोण, मला कधी कळलेच नाही. नाही भेटला असा कोणी, ज्याने मला छळले नाही…'