

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मी कोणतेही विधान केलेले नाही. मी कुणाचाही अवमान केलेला नसल्याने आपण दिलगिरी व्यक्त करणार नाही, मी माफी मागणार नाही. हक्कभंग समिती देईल ती शिक्षा आपण भोगण्यास तयार आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हक्कभंग समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.
सुषमा अंधारे यांची चौकशी समितीच्या नियमांनुसार आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पडली असल्याचे समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. संबंधित प्रकरणातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पुढील प्रक्रिया समितीच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्यासह, आमदार प्रवीण दरेकर आणि समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
लाड म्हणाले की, “यापूर्वी याच प्रकरणात कुणाल कामरा यांची साक्ष नोंदवण्यात आली. प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांचाही या प्रकरणात समावेश झाला. समिती सदस्यांनी सुमारे 22 ते 23 प्रश्न विचारले.
आमदार अनिल परब आणि आमदार मनीषा कायंदे यांनीही प्रश्न विचारले. काही प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर काही बाबींमध्ये गोलमोल उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. काही विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर सार्वजनिक भाष्य करणे योग्य नाही. मात्र, हक्कभंग समितीसमोरील साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.”
या सुनावणीवेळी सुषमा अंधारे यांना त्यांनी कुणाल कामगाराच्या विडंबात्मक गाण्याला पाठिंबा देणाऱ्या समाजमाध्यमावरील संदेश तसेच वक्तव्यावरून स्पष्टीकरण विचारण्यात आले. याला उत्तर देताना अंधारे म्हणाल्या, आपले वक्तव्य हे हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांविरोधात बोलले होते.
त्यात कोणीही विधिमंडळाचा सदस्य नव्हता. त्यामुळे मी कुणाचाही अवमान केलेला नाही. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखाद्या व्यक्तीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असेल, तर त्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. त्याच न्यायातून आपण कुणाल कामराला पाठिंबा दिला. त्याची आणि माझी ओळख नाही, आमची कधीही गाठभेट झालेली नाही. त्यामुळे कामरासारख्या कलाकाराने एकटा आहे असे समजू नये, त्याच्यासोबत संविधानिक भूमिका घेणारे लोकं आहेत हे दर्शविण्यासाठी माझे ट्विट होते, असे त्यांनी स्पष्ट केले.