Sanjay Raut : सरन्यायाधीशांप्रमाणे आम्हालाही नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार - संजय राऊत 

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला सुनावलेच्या प्रकरणावर केले मत व्यक्त
Sanjay Raut
Sanjay Raut : सरन्यायाधीशांप्रमाणे आम्हालाही नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार - संजय राऊत Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : ज्या पद्धतीने सरन्यायाधीशांना नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे लोकशाहीत आम्हालाही नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला सुनावले होते, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.

मागील ३ वर्षात ४ न्यायाधीश बदलले तरी शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचा निकाल दिला नाही. आमचा वाघांचा पक्ष आहे, आम्ही डरकाळी फोडणारे आहोत, असेही ते म्हणाले. गुरुवारी संजय राऊतांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा, विधान परिषद निवडणूक, नीट पेपरफुटी प्रकरण तसेच विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीवर बोलताना राऊत म्हणाले की, त्या पार्टीचे फॉलोअर्स कोटींमध्ये वाढले आहेत. देशातील तरुणांना एवढ्या प्रमाणात समर्थन द्यावे लागत आहे, याचा अर्थ बेरोजगारी गंभीर आहे. मात्र त्या पक्षाने परदेशातून नव्हे तर भारतात येऊन आंदोलन करावे, पंतप्रधान मोदी यांनी त्यांना “मेलोडी चॉकलेट” द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

केंद्र सरकारने बोलावलेल्या मंत्रिपरिषद बैठकीवर टीका करताना राऊत म्हणाले की, आता पंतप्रधान मंत्र्यांना चॉकलेट वाटतील, त्यांचे रिपोर्ट कार्ड बघतील पण दोन प्रमुख नेत्यांचे रिपोर्ट कार्ड कोण तपासणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना राऊत यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. महाराष्ट्र आणि राजस्थानमधून जास्त आरोपी अटकेत हे. आतापर्यंत अटक झाली ते बहुतांश भाजपचे आश्रित आहेत, असा आरोप त्यांनी केला.

विधान परिषद निवडणुकांवर बोलताना राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला. “महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला फार महत्व नाही. एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाही भाजपने विधान परिषदेत काही देऊ केले नाही त्यामुळे ते दिल्लीत येऊन गेले, असा दावा त्यांनी केला. तसेच महाविकास आघाडीची ताकद मर्यादित असली तरी जिथे ताकद आहे तिथे आम्ही निवडणूक जोरात लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news