Shraddha Dubey video
लखनौ: २८ वर्षीय हॉटेल मालक शिव शर्मा याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आलेली मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रद्धा दुबे अखेर समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून तिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिव शर्माचा मृत्यू खून नसून आत्महत्या होती, असा दावा तिने या व्हिडिओमध्ये केला आहे.
१ मिनिट १५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये श्रद्धा दुबेने तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावरील संपर्कांच्या आधारे तिला राजकारणी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत तिने या अफवा असल्याचे म्हटले आहे. "केवळ कोणी मला इन्स्टाग्रामवर फॉलो करतं, याचा अर्थ असा होत नाही की माझी त्यांच्याशी ओळख आहे किंवा माझे त्यांच्याशी काही संबंध आहेत," असे स्पष्ट करत तिने माध्यमांना पुराव्याशिवाय निष्कर्ष न काढण्याचे आवाहन केले.
आपण पळून गेले नसून पोलिसांसमोर हजर होऊन जबाब नोंदवण्यास तयार असल्याचेही ती म्हणाली. "मी लपलेली नाही. मला पोलिसांसमोर येऊन सर्व सत्य सांगायचे आहे," असे ती या व्हिडिओत सांगताना दिसत आहे. तसेच, प्रकृती ठीक नसल्याने सध्या सर्व परिस्थिती सविस्तर सांगू शकत नाही, असे सांगत तिने शिव शर्माची हत्या नव्हे, तर आत्महत्या आहे, असा दावा पुन्हा एकदा केला आहे.
९ ऑक्टोबर रोजी हजरतगंज येथील 'अवध ग्रीन अपार्टमेंट'च्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून शिव शर्मा याचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो गेल्या चार महिन्यांपासून श्रद्धा दुबेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या घटनेनंतर, शर्मा याची आई रंजना शर्मा यांनी एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी दुबे, तिची बहीण रश्मी, चालक आदिल आणि इतरांवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
घटना घडल्यापासून या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून, लखनौ पोलिसांनी श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी आणि तन्वीर अली उर्फ दानिश यांच्याविषयी माहिती देणाऱ्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, तपासादरम्यान एका भारत-नेपाळ सीमेवरील बहाराच जिल्ह्यातून श्रद्धा दुबेची संशयित कार जप्त करण्यात आली आहे.