Model Shraddha Dubey:
लखनौ : लखनौमधील बालू अड्डा भागातील 'अवध ग्रीन अपार्टमेंट' संकुलात व्यापारी शिव शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप असलेली त्यांची 'लिव्ह-इन पार्टनर' आणि मॉडेल श्रद्धा दुबे, आपली बहीण रश्मीसह नेपाळला पळून गेली आहे. श्रद्धावर या व्यापाऱ्याला अपार्टमेंटमधून खाली ढकलल्याचा आरोप आहे; त्यांचा मृतदेह जमिनीवर केवळ अंतर्वस्त्राच्या स्थितीत आढळला होता. श्रद्धाच्या फ्लॅटची झडती घेतली असता 'सेक्स टॉईज', लैंगिक क्षमता वाढवणारी औषधे आणि अमली पदार्थांसह अनेक संशयास्पद वस्तू सापडल्या. तिच्या कॉल डिटेल्समधून काही नामवंत व्यक्तींशी संपर्क असल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर मॉडेल श्रद्धा दुबे हिने चौक भागात तिचा आधीचा प्रियकर, एक चालक आणि इतरांची भेट घेतली. त्यानंतर ती सीतापूर-बहराइच मार्गे नेपाळला पळून गेली. श्रद्धा आणि तिच्या बहिणीला नेपाळमध्ये पोहोचवण्यात दुबग्गा येथील आमिर आणि आलमबागमधील गढी कनौरा परिसरात राहणाऱ्या दानिश यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी हजरतगंज पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारी दानिश आणि आमिर यांच्या घरी छापे टाकले. मात्र, दोघेही घरी आढळले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करून काही महत्त्वाची माहिती मिळवली आहे. श्रद्धाला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून काही बांधकाम व्यावसायिकांसह नामवंत व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर आहेत.
शिवा शर्मा हे अलीगंजमधील कपूरथला परिसरात राहत होते. अपार्टमेंटच्या खाली त्यांचा मृतदेह केवळ अंतर्वस्त्रांमध्ये आढळला होता. शिवा यांच्या आई रंजना यांनी श्रद्धा दुबे हिच्यावर मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा, सिगारेटचे चटके देण्याचा तसेच माफिया आणि अनेक नामवंत व्यक्तींकडून धमक्या दिलवण्याचा आरोप केला आहे. शिवा हे गेल्या वर्षभरापासून श्रद्धा दुबे हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रंजना यांनी श्रद्धा, तिची बहीण रश्मी आणि अन्य दोघांविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर श्रद्धा, तिची बहीण आणि अन्य आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस आणि फॉरेन्सिक पथकांनी श्रद्धाच्या फ्लॅटमधून जप्त केलेले विविध अंमली पदार्थ, उत्तेजक वस्तू आणि औषधे तपासणीसाठी पाठवली आहेत. पोलिस फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालाची वाट पाहत असून, त्यातील निष्कर्षांवरून पुढील कारवाई निश्चित केली जाईल.
काही महिन्यांपूर्वी श्रद्धा दुबे हिने व्यावसायिक रिझवान यांच्याविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात विनयभंगासह अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी रिझवान यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र, या प्रकरणात श्रद्धावर खंडणीसाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचे आरोप झाले होते. पैसे उकळण्यासाठी तिने हा गुन्हा दाखल केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या दिशेनेही हजरतगंज पोलीस तपास करत आहेत.
नेपाळ हे श्रद्धासाठी परिचित ठिकाण असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चौकशी केलेल्या श्रद्धाशी संबंधित काही व्यक्तींनी ती वारंवार नेपाळला जात असल्याचे सांगितले. नेपाळमधील अनेक व्यक्तींशी तिचा संपर्क असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय, काही नामांकित इव्हेंट कंपन्यांचे संचालक तसेच स्टेज शो आणि फॅशन शो आयोजित करणाऱ्या व्यक्तींशी श्रद्धाचे जवळचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तींची श्रद्धासोबत वारंवार भेट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे हे आयोजक आणि इव्हेंट मॅनेजर्सही सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.