

Sonia Gandhi book controversy
मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचा आरोप करत, सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात आपण आपल्या वकिलांशी चर्चा करत असून, पुस्तकातील विधानांना कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे आढळल्यास सोनिया गांधींविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले की, "मी सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील व्याख्यानाच्या निमित्ताने कर्नाटक दौऱ्यावर असल्याने हे संपूर्ण पुस्तक अद्याप वाचलेले नाही. मात्र, पुस्तकातील ज्या पानांवर सावरकरांचा उल्लेख आहे, ती पाने मी वाचली आहेत. त्यामध्ये कोणताही संदर्भ न देता काही विधाने करण्यात आली आहेत. या प्रकरणी कायदेशीर सल्लागारांशी चर्चा सुरू असून, संबंधित मजकुरात तथ्य नसल्याचे सिद्ध झाल्यास कायदेशीर पाऊल उचलले जाईल, असे ते म्हणाले.
सध्या तरी या पुस्तकावर बंदी घालण्याची आपली कोणतीही मागणी नसल्याचे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण पुस्तक न वाचल्यामुळे बंदीची मागणी करणे योग्य ठरणार नाही. प्रथम पुस्तकातील संदर्भ आणि विधानांची सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर दिशा ठरवली जाईल, असे ते म्हणाले.
सोनिया गांधी यांच्या 'बिलाँगिंग : जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकाचा निषेध करताना शिंदे गटाच्या नेत्यांनी बुधवारी या पुस्तकाची पाने माध्यमांना जमवून टराटरा फाडली. या गडबडीत शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांनी या पुस्तकात असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडल्याने राजकीय वाद पेटला.
काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल अनुचित लेखन केल्याबद्दल शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केले होते. या आंदोलनात स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही उतरले होते. मणीशंकर अय्यर यांच्या छायाचित्राला चप्पल हाणताना शिवसेनाप्रमुख दिसत असून पाठीमागे दिवंगत नेते मनोहर जोशीही दिसतात. असे हे छायाचित्र शायना यांनी फाडले. याच छायाचित्राचे पान त्यांच्या बाजूलाच उभ्या शीतल म्हात्रे यांनीही फाडले. त्यावरून आता गदारोळ झाला आहे.