Sonia Gandhi | शरद पवारांनी परदेशी मुळाचा मुद्दा मांडल्‍याने अश्रू आले : सोनिया गांधी

‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्‍तकात १९९९ मधील राजकीय घडामोडींवर भाष्य
Sonia Gandhi |
Sonia Gandhi | शरद पवारांनी परदेशी मुळाचा मुद्दा मांडल्‍याने अश्रू आले : सोनिया गांधी
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातून १९९९ मधील काँग्रेसमधील राजकीय संघर्षाची नवी बाजू समोर आली आहे. तत्कालीन काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्यासह काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित केला होता. या घटनाक्रमामुळे आपल्याला प्रचंड दु:ख झाले होते. भारताप्रति असलेल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केल्याने भावुक झाले, माझ्‍या डोळ्यांत अश्रू आले आणि बैठकीतून बाहेर पडले, असा उल्लेख सोनिया गांधी यांनी पुस्तकात केला आहे.

सोनिया गांधी यांनी पुस्तकाच्या ३९७ व्या पानावर या घटनेचा संदर्भ दिला आहे. मे १९९९ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीतील तीन सहकाऱ्यांनी आपल्याला सविस्तर पत्र पाठवून परदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित केला होता. परदेशी जन्मामुळे सोनिया गांधी यांनी भारतातील उच्च पद भूषवू नये, अशी भूमिका या पत्रातून मांडली होती. या नेत्यांची नावे त्यांनी नमूद केली नसली, तरी शरद पवार यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे नेते’ असा केला आहे. राजकारणात प्रवेशावेळी पद किंवा सत्ता मिळवण्याचा हेतू नव्हता असे सांगत गांधी यांनी राजकारणात येण्याचा आग्रह करणारे सहकारीच विरोधात गेल्याची खंतही व्यक्त केली आहे.

सोनिया गांधी यांनी पुस्तकात शरद पवार यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडण्याचाही उल्लेख केला आहे. पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे दोन्‍ही पक्ष स्वतंत्रपणे लढले; मात्र निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत सत्ता स्थापन केली होती.

याच राजकीय घडामोडींविषयी पवार यांच्या आत्मचरित्रात वेगळी मांडणी

याच राजकीय घडामोडींविषयी शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात वेगळी मांडणी केली आहे. १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडल्यानंतर सोनिया गांधी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, मुलायमसिंह यादव यांनी परदेशात जन्मलेल्या व्यक्तीला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार नसल्याची भूमिका घेतली होती, असे पवार यांनी नमूद केले आहे. या घटनाक्रमामागे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि अर्जुन सिंह यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा प्रभाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हे पाहता १९९९ मधील परदेशी मुळाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाची दोन्ही नेत्यांच्या आत्मकथनांतून वेगवेगळी बाजू समोर आली असून, सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तकामुळे या जुन्या राजकीय संघर्षाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.