Life at Sea: नोकरी सोडली, घर विकलं आणि समुद्र गाठला; 42 फूटांच्या बोटीवर कसं जगतंय हे कुटुंब? 4 वर्षांपासून समुद्रातचं आहे त्यांचं घर

Retired Indian Navy Captain Family Living on Sailboat: भारतीय नौदलाचे निवृत्त कॅप्टन गौरव गौतम आणि त्यांच्या पत्नी वैदेही चिटणवीस यांनी आरामदायी आयुष्य सोडून सेलिंग बोटीवर राहण्याचा निर्णय घेतला.
Indian Family Living on Sailboat
Indian Family Living on SailboatPudhari
Published on: 
Updated on: 

Retired Indian Navy Captain Family Living on Sailboat: आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि जगण्याचा नवा अनुभव घेण्याची इच्छा यामुळे भारतीय नौदलाचे निवृत्त कॅप्टन गौरव गौतम आणि त्यांच्या पत्नी वैदेही चिटणवीस यांनी आरामदायी आयुष्य सोडून बोटीवर राहण्याचा निर्णय घेतला.

1 ऑक्टोबर 2022 रोजी मलेशियातील पेनांग येथे त्यांनी आपल्या 42 फूट लांबीच्या ‘रीवा’ या सेलिंग बोटीवर राहायला सुरुवात केली. त्यावेळी पुढे काय होणार, याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र चार वर्षांनंतरही त्यांचा हा प्रवास सुरू आहे. ते समुद्रावरच राहत आहेत, शिकत आहेत, प्रवास करत आहेत आणि आपला अनुभव लोकांसोबत शेअर करत आहेत.

गौरव आणि वैदेही यांनी आपल्या मुलीला वेगळ्या वातावरणात वाढवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. बहुतांश पालक मुलांना स्थिर आयुष्य मिळावं म्हणून घर घेतात. मात्र या दाम्पत्याने याच्या अगदी उलट निर्णय घेतला. त्यांनी घराऐवजी एक सेलिंग बोट घेतली आणि समुद्रालाच आपलं घर बनवलं.

गौरव, वैदेही आणि त्यांची मुलगी कायाला जग फक्त पुस्तकांमधून समजण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवायला मिळावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी जवळपास आपली सर्व मालमत्ता विकली आणि नोकरी सोडली. त्यांच्या नव्या आयुष्यासाठी त्यांनी केवळ 120 किलो सामान जवळ ठेवलं.

त्यांचं नवं घर होतं 1988 मध्ये तयार झालेली 42 फूट लांबीची ‘रीवा’ ही सेलिंग बोट. समुद्रातील लांब प्रवासासाठी तयार करण्यात आलेली ही बोट सूर्यप्रकाश आणि वाऱ्याच्या ऊर्जेवरही चालते. फ्रिज, फ्रीझर, लॅपटॉपपासून समुद्रातील दिशादर्शक उपकरणांपर्यंत अनेक गोष्टींसाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो.

मात्र समुद्रावर राहण्यासाठी सर्वात मोठं आव्हान बोट चालवणं नव्हतं. खरं आव्हान होतं ते कमी साधनांमध्ये जगायला शिकणं. बोटीमध्ये दोन छोट्या केबिन, बसण्यासाठी एक छोटा भाग, स्वयंपाकघर आणि लहानसं बाथरूम आहे. इथे प्रत्येक जागेचा विचार करून वापर करावा लागतो. जेवणाची आधीपासून तयारी करावी लागते. पाणी, अन्न आणि इतर साधनांचा काटकसरीने वापर करावा लागतो.

कारण समुद्राच्या मध्यभागी काही वस्तू संपल्या तर लगेच ऑनलाइन ऑर्डर करून त्या मागवता येत नाहीत. ना ब्लिंकिट, ना झोमॅटो आणि ना अॅमेझॉन त्यांच्या मदतीला येणार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं नियोजन आधीच करावं लागतं.

समुद्रावरचं आयुष्य हवामानावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. कधी प्रवास करायचा, कुठे थांबायचं आणि कुठल्या दिशेने जायचं, हे अनेकदा हवामान ठरवतं. एका देशातून दुसऱ्या देशात जाताना पासपोर्ट आणि इमिग्रेशनशी संबंधित वेगवेगळ्या अडचणींचाही सामना करावा लागतो.

Indian Family Living on Sailboat
Rise & Fall: कोण आहे ही अभिनेत्री? क्रिकेटर्सही आहेत फिदा; वीरेंद्र सेहवागसमोर केला मोठा खुलासा

समुद्र शांत असेल तर प्रवास सुंदर वाटतो. मात्र हवामान अचानक बदललं तर परिस्थिती कठीण होऊ शकते. या कुटुंबाने आतापर्यंत हजारो मैलांचा प्रवास केला आहे. त्यांनी समुद्र ओलांडत विविध देशांच्या सीमा पार केल्या आहेत.

या सगळ्या प्रवासात त्यांची मुलगी कायाही समुद्रालाच आपलं खेळाचं मैदान मानत मोठी होत आहे. तिच्यासाठी जगण्याचा अनुभव इतर मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

Indian Family Living on Sailboat
Gold Price Today: आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल ₹2,800 ची घसरण; चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

या प्रवासात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस कठीण असतात. काही अनपेक्षित घटना घडतात. मात्र चार वर्षांच्या या प्रवासाने त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या आहेत.

त्यांना मिळाला वेळ, स्वातंत्र्य आणि एकमेकांसोबत जगण्याचा खरा अनुभव. चार वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. घर, नोकरी आणि सुखसोयींचं आयुष्य मागे सोडून त्यांनी समुद्राला आपलं घर मानलं. आजही ‘रीवा’वर त्यांचा प्रवास सुरुच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news