

Republic Day Eve Rescue: जम्मू-काश्मीरमधील डोंगराळ भागात, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीचा प्रेरणादायी प्रसंग घडला. डोडा जिल्ह्यातील गावकऱ्यांनी कर्तव्य बजावत, तब्बल 15 किलोमीटरचा प्रवास करून 20 हून अधिक भारतीय सैन्याच्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली.
हे जवान सुमारे 11 हजार फूट उंचीवरील मोर्चा टॉप (Morcha Top) परिसरात दहशतवादविरोधी शोधमोहीम राबवत असताना, 5 ते 6 फूट जाड बर्फवृष्टीमुळे अडकून पडले होते. हा भाग दाट जंगलांनी वेढलेला असून, खराब हवामानामुळे तेथून हालचाल करणे अत्यंत कठीण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी जोरदार हिमवृष्टी झाल्यानंतर जवानांचा संपर्क तुटला. 24 जानेवारीला संध्याकाळी, गुंडणा येथील सैन्य तळावरून अधिकाऱ्यांनी स्थानिक गावकऱ्यांकडे मदतीची विनंती केली.
25 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता गावकऱ्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. सैन्याने त्यांना बूट, हातमोजे आणि फुड पाकिट दिले; मात्र फावडे, कुदळी यांसारखी हत्यारं घेऊन बर्फ फोडत वाट काढण्याचे काम गावकऱ्यांनी केले.
जवळपास पाच तास चाललेल्या या प्रवासानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते जवानांपर्यंत पोहोचले. सायंकाळपर्यंत सर्व जवानांना सुरक्षितपणे खाली आणण्यात यश आले.
हे जवान ‘ऑपरेशन त्राशी-1’ अंतर्गत दहशतवादविरोधी शोधमोहीम राबवत होते. ही मोहीम गेल्या पंधरा दिवसांपासून डोडा आणि किश्तवार जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलांमध्ये सुरू आहे.
18 जानेवारी रोजी किश्तवारमधील छत्रू परिसरातील सिंहपोरा येथे झालेल्या चकमकीत विशेष दलातील हवालदार गजेंद्र सिंह शहीद झाले होते, तर सात जवान जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी मोर्चा टॉपवर जवान तैनात करण्यात आले होते.
या घटनेबाबत बोलताना संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल सुनील बरटवाल यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांनी सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून बर्फातून मार्ग तयार केला आणि जवानांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
याच दिवशी Border Roads Organisation (BRO) नेही डोडा जिल्ह्यातील छातरगाळा टॉप परिसरात बचावकार्य केले. भद्रवाह-चांबा आंतरराज्य मार्गावर, सुमारे 11,500 फूट उंचीवर अडकलेल्या 40 जवानांसह 20 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हे बचावकार्य 26 जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरू होते.
डोडा आणि किश्तवार जिल्ह्यांत जोरदार हिमवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. किश्तवारमधील दुर्गम वर्वन खोऱ्यात हिमस्खलन झाल्याची माहिती असून, त्यामुळे चरण्यासाठीची मैदाने उद्ध्वस्त झाली आहेत. पशुपालनावर अवलंबून असलेल्या स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कठीण काळात स्थानिक नागरिक आणि भारतीय सैन्य यांच्यातील विश्वास आणि एकजूट हीच देशाची खरी ताकद आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेला हा प्रसंग देशभक्तीचे आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण आहे.