

मुख्य मुद्दे :
थाथरी उप-विभागात ढगफुटीमुळे महापूर, १० हून अधिक घरे जमीनदोस्त.
बचावकार्य सुरू, मात्र मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे अडथळ्यांची शक्यता.
रामबनमध्ये भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील थाथरी उप-विभागात झालेल्या ढगफुटीमुळे मोठा विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या महापुरात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, १० हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे.
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या पावसानंतर झालेल्या ढगफुटीमुळे परिसरात महापुराची स्थिती निर्माण झाली. प्रशासनाने सायंकाळपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ढगफुटीनंतर संपूर्ण परिसरात महापुराचे पाणी पसरले असून, रस्त्यातील झाडे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक घरे पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली आहेत, तर काही घरांची मोठी पडझड झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपात स्थानिकांची आयुष्यभराची कमाई क्षणार्धात नाहीशी झाली आहे. जिल्ह्यातील उंच भागातील रहिवासी आपल्या घरातून मौल्यवान वस्तू बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहेत.
समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमध्ये पाण्याचा प्रचंड वेग आणि प्रवाह स्पष्टपणे दिसत आहे. परिसरातील नद्यांना पूर आला आहे. बाजारपेठांमध्येही पाणी शिरले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने बाधित भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, रामबन परिसरात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संपूर्ण जम्मूमध्ये मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहत असून, तवी नदीच्या पुराचे पाणी रहिवासी भागांमध्ये शिरत आहे. नदीकिनारी असलेली अनेक वस्त्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही ठिकाणे रिकामी केली आहेत.
यापूर्वी उत्तराखंडमधील धराली येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेने संपूर्ण गावात विध्वंस घडवला होता, ज्यात पाचहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक जण बेपत्ता झाले होते. त्या घटनेच्या भीषणतेता दाखवणारे अनेक व्हिडिओ समोर आले होते.
त्याचप्रमाणे, १४ ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील चशोती गावात ढगफुटीमुळे मोठा हाहाकार माजला होता. मचैल माता यात्रेच्या मार्गावर असलेल्या या गावात त्या दिवशी हजारो भाविक उपस्थित होते. अचानक आलेल्या महापुरामुळे घरे आणि दुकानांचे नुकसान झाले, तसेच यात्रेकरूंसाठी उभारण्यात आलेला एक लंगरही वाहून गेला.
या भीषण दुर्घटनेत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर २०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. डोडा जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती या जुन्या जखमा ताज्या करणारी आहे.