

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी वैद्यकीय महाविद्यालयात नीट परीक्षेच्या आधारे प्रवेश झाले असून अंतिम यादीत ५० पैकी ४२ विद्यार्थी मुस्लिम असल्याने त्या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुस्लिम व्यक्तीने शाळा सुरू केल्यामुळे ती मदरसा असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. कोणतीही चौकशी, नोटीस किंवा सुनावणी न करता प्रशासनाने थेट बुलडोझर चालवून शाळा पाडली, असे गंभीर आरोप काँग्रेसने केंद्रात सत्ताधारी भाजपवर केले.
देशातील विविध भागांत अलीकडे घडलेल्या घटनांचा दाखला देत काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर शिक्षण व्यवस्थेला जाणीवपूर्वक सांप्रदायिक रंग देत उद्ध्वस्त करण्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीर व लडाखचे प्रभारी, खासदार डॉ. सय्यद नासिर हुसेन आणि राष्ट्रीय सचिव दिव्या मडेरणा यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली.
पत्रकार परिषदेत डॉ. नासिर हुसेन म्हणाले की, चांगली शिक्षण व्यवस्था ही विकसित राष्ट्राची पायाभरणी असते. मात्र सध्याचे सरकार शिक्षण क्षेत्रात “विष कालवण्याचे” काम करत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील एका प्रकरणाचा उल्लेख करत सांगितले की, अब्दुल नईम नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या २० ते २२ लाख रुपयांच्या खर्चातून आदिवासी मुलांसाठी शाळा उभारली होती. सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन शाळा सुरू करण्यात आली. मात्र मुस्लिम व्यक्तीने शाळा सुरू केल्यामुळे ती मदरसा असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. कोणतीही चौकशी, नोटीस किंवा सुनावणी न करता प्रशासनाने थेट बुलडोझर चालवून शाळा पाडली. या प्रकरणात अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
डॉ. हुसेन यांनी जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी मेडिकल कॉलेजचा मुद्दाही उपस्थित केला. नीट परीक्षेच्या आधारे प्रवेश झाले असून अंतिम यादीत ५० पैकी ४२ विद्यार्थी मुस्लिम असल्याने कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. सप्टेंबर २०२५ मध्ये परवानगी देताना पायाभूत सुविधा व नियमांची तपासणी झाली नव्हती का, असा सवाल करत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचाही गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. श्री माता वैष्णो देवी वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याची आणि बैतूलमधील शाळा पुनर्बांधणीची व दोन्ही प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि बुलडोझर संस्कृती व द्वेषपूर्ण राजकारण थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील तणावपूर्ण वातावरणाचा उल्लेख करत त्यांनी कर्नाटक, आसाम आणि उत्तर प्रदेशातील घटनांचा दाखला दिला. शिक्षण संस्थांचे खुलेआम भगवेकरण होत असून जामिया मिलिया इस्लामिया, अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि जेएनयूच्या निधीत मोठ्या प्रमाणावर कपात झाल्याचे त्यांनी सांगितले. या परिस्थितीमुळे देशात ‘ब्रेन ड्रेन’ वाढत असल्याचीही चिंता त्यांनी व्यक्त केली.