
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली ते जयपूरदरम्यान इलेक्ट्रीक महामार्ग उभारण्यासाठी विदेशी कंपन्यांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भविष्यात हा महामार्ग झाल्यास तो देशातला पहिला इलेक्ट्रीक महामार्ग ठरणार आहे. ई-महामार्गावर केवळ विजेवर गाड्या धावतात, असे गडकरी यांनी नमूद केले. ना. गडकरी यांनी अलिकडेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा पाहणी दौरा केला होता.
दिल्ली ते जयपूरदरम्यान ई-महामार्ग बनविणे हे आपले स्वप्न असल्याचे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, रेल्वेगाड्या ज्याप्रमाणे विजेवर धावतात, त्याप्रमाणे आगामी काळात बसेस, ट्रक्स अशी मोठी वाहनेदेखील विजेवर धावू लागतील.
दिल्ली-जयपूरदरम्यानचा ई-हायवे प्रकल्प अजून प्राथमिक टप्प्यात आहे. यासंदर्भात विदेशी कंपन्यांसोबत बोलणी सुरु आहेत. देशातील पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाला सरकारने मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेमुळे दिल्ली ते मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ 24 वरुन 12 तासापर्यंत कमी होणार आहे. या एक्सप्रेसवे मुळे इंधनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच गुजरातमधून हा महामार्ग जाणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="37929"]