

Kedarnath Flood Man Found Alive After 11 Years: 2013 मध्ये आलेल्या भीषण केदारनाथ पुरामुळे हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली. अनेक जणांना जीव गमवावा लागला. शेकडो लोक बेपत्ता झाले. या बेपत्ता लोकांमध्ये रुडकीचा शिवमही होता. अनेक दिवस शोधाशोध करूनही तो सापडला नाही. शेवटी कुटुंबीयांनी हताश होऊन त्याचा अंत्यविधी केला होता. मात्र 11 वर्षांनी घडलेल्या एका घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला. ‘मृत’ समजलेला शिवम जिवंत घरी परत आला.
2021 मध्ये संभाजीनगर येथील एका मंदिरात शिवम राहत असल्याचे समोर आले. त्याच वेळी मंदिरात चोरी झाली. काही आरोपींनी शिवमचाही गुन्ह्यात समावेश असल्याचे सांगितले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. न्यायालयात नेल्यानंतर न्यायालयाने त्याची मानसिक स्थिती तपासण्याचे आदेश दिले. तपासात निदर्शनास आणलं की तो डिसऑर्गनाइज्ड सिझोफ्रेनिया या आजाराने त्रस्त आहे. कोर्टाने उपचारासाठी त्याला पुण्यातील रीजनल मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे आदेश दिले.
पुणे येथून शिवमबद्दलची नोंद रुडकीच्या सरकारी मनोरुग्णालयाकडे पाठवण्यात आली. तिथे त्याच्या शालेय शिक्षणाशी संबंधित एक छोटासा तपशील सापडला. हाच धागा पकडून अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आणि अखेर त्याच्या कुटुंबाचा पत्ता लागला. दुसरीकडे, न्यायालयानेही स्पष्ट केले की शिवमचा मंदिरातील चोरीशी कुठलाच संबंध नाही. हॉस्पिटलने उपचारानंतर त्याला डिस्चार्जही दिला.
5 नोव्हेंबर 2025 रोजी, तब्बल 11 वर्षे मृत मानला गेलेला शिवम अखेर आपल्या भावाला भेटला. घरच्यांसाठी तो क्षण शब्दात न सांगता येणारा होता. ज्याचा अंत्यसंस्कार झाला, तोच माणूस त्यांच्या दारात जिवंत उभा होता. शिवमला मात्र अजूनही केदारनाथपासून तो संभाजीनगरपर्यंत कसा आला, कोणाबरोबर राहिला या बद्दल काहीच आठवण नाही.