

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एकीकडे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या राज्यांनी बर्फाची पांढरी चादर ओढली आहे, तर दुसरीकडे मैदानी प्रदेशात मुसळधार पावसाने हजेरी लावण्याचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच पर्वतीय भागांमध्ये अविरत हिमवर्षाव सुरू आहे, ज्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्येही हिमवर्षाव सुरू आहे.
उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ आणि हेमकुंड साहिब येथे मंगळवारी या हंगामातील पहिल्या हिमवर्षावाची नोंद झाली. हेमकुंड साहिब परिसरात सुमारे 2 ते 3 इंच बर्फ साचला आहे. या हिमवर्षावामुळे केदारनाथमधील तापमानाचा पारा थेट 5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. हवामानाचा थेट परिणाम सध्या सुरू असलेल्या चारधाम यात्रेच्या दुसर्या टप्प्यावर होत आहे. दररोज सुमारे 5 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत. मुसळधो पाऊस आणि हिमवर्षावामुळे भाविकांची चिंता वाढली आहे.
उत्तराखंडप्रमाणेच हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती, चंबा आणि किन्नौर या जिल्ह्यांमध्येही जोरदार हिमवर्षाव झाला आहे.