khan Sir University Plan
khan Sir University Plan Pudhari

khan Sir University: खान सरांचे विद्यापीठ बांधण्याचे स्वप्न तुटले; खरेदी केलेली जमीनही विकली, नेमकं काय घडलं?

khan Sir University Project: खान सर यांचं कोईलवरमध्ये भव्य विद्यापीठ उभारण्याचं स्वप्न सध्या तरी अपूर्ण राहिलं आहे. जमिनीचे दर अचानक वाढवल्यामुळे आणि स्थानिक अडथळ्यांमुळे त्यांनी आधी खरेदी केलेली जमीनही विकली.
Published on

Khan Sir’s Mega University Plan Collapses: बिहारमधील कोईलवर परिसरात भव्य विद्यापीठ उभारण्याचा खान सरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अचानक अडचणीत सापडला असून, त्यांनी आधीच खरेदी केलेली जमीनही आता विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खान सरांचं स्वप्न पूर्ण होणार नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बातमी पसरली होती की, खान सर कोईलवरमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून तिथे आधुनिक विद्यापीठ उभारण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला काही एकर जमिनीची नोंदणीही पूर्ण झाली होती. खान सर स्वतः रजिस्ट्री कार्यालयात हजर राहिले होते आणि पहिल्या टप्प्यातील व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाला होता. मात्र त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली.

खान सर सांगतात की हा प्रकल्प केवळ शिक्षणसंस्थेपुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण परिसराच्या विकासाचा प्लॅन होता. पटण्याला लागून असलेल्या या भागात चांगली कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळे इथे विद्यापीठ उभं राहिलं असतं तर रोजगार, व्यवसाय आणि पायाभूत सुविधांनाही चालना मिळाली असती. त्यांचा अंदाज होता की सुमारे एक हजार एकर जागेत एक आत्मनिर्भर, हायटेक आणि जागतिक दर्जाचा कॅम्पस उभा राहील.

या प्रकल्पासाठी त्यांनी आधीच अनेक जमीनमालकांशी चर्चा केली होती. बाजारभावापेक्षा जास्त दर देऊन व्यवहार निश्चित करण्यात आला होता. अनेकांना आगाऊ रक्कमही देण्यात आली होती आणि जवळपास 10 ते 15 एकर जमिनीची नोंदणीही पूर्ण झाली होती. पुढील व्यवहार फक्त वेळेअभावी प्रलंबित होता.

khan Sir University Plan
India Export Promotion Scheme: निर्यातीला 25 हजार कोटींचे बळ; केंद्राची सातकलमी महायोजना जाहीर

त्यानंतर या प्रकल्पाची चर्चा परिसरात हळूहळू पसरू लागली आणि चित्र बदलत गेलं. जमीनमालकांनी अचानक दर अनेक पटींनी वाढवायला सुरुवात केली. काहींनी आगाऊ रक्कम घेतल्यानंतरही ठरलेल्या किमतीत रजिस्ट्री करण्यास नकार दिला. खान सरांच्या म्हणण्यानुसार, “लोकांना जसं कळलं की इथे युनिव्हर्सिटी होणार आहे, त्यानंतर त्यांनी जमिनीचे दर दहा पट वाढवले. आम्ही आधीच बाजारभावापेक्षा जास्त पैसे देत होतो. सगळं ठरलेलं होतं, पण शेवटच्या टप्प्यात परिस्थिती हाताबाहेर गेली.”

या सगळ्या गोंधळात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. स्थानिक पातळीवर दबाव वाढला, व्यवहारांतील अडथळे आणि सतत बदलणाऱ्या अटींमुळे अखेर त्यांनी हा प्रकल्प तिथून मागे घेण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही, तर जेवढी जमीन आधी खरेदी केली होती, तीही विकावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.

khan Sir University Plan
AI Summit protest|"नेपाळप्रमाणे आंदोलनाचा कट.." : AI Summit मधील काँग्रेस आंदोलनावर पोलिसांनी न्‍यायालयात कोणता दावा केला?

खान सरांच्या कल्पनेतील विद्यापीठ पूर्णपणे आधुनिक संकल्पनेवर आधारित असणार होतं. सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, स्वतः वीज निर्मिती करणारी यंत्रणा, एमबीए विद्यार्थ्यांनी चालवलेला मॉल अशा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या सुविधा त्यात असणार होत्या. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते शिक्षण न घेता प्रत्यक्ष व्यवसायिक शिक्षण घ्यावे, आणि हे सर्व कॅम्पसमध्येच शिकावं, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र हे स्वप्न सध्या तरी भंग पावलं आहे.

खान सरांनी सांगितलं की, कोईलवरमधील योजना रद्द झाली असली, तरी विद्यापीठ उभारण्याचं स्वप्न कायम आहे. आता ते हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवत आहेत. मात्र यावेळी ते जागेची माहिती सार्वजनिक करणार नाहीत. जमीन खरेदीही थेट स्वतःच्या नावाने न करता वेगवेगळ्या लोकांच्या नावावर केली जाईल आणि नंतर ती स्वतःकडे ट्रान्सफर केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यामुळे खर्च वाढेल, पण प्रकल्प मार्गी लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news