

Operation Sindoor Timeline :
भारताने २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला. सलग दोन दिवस भारताने दिलेल्या तडाख्यानंतर पाकिस्तानचे कबंरड मोडलं. शनिवारी (१० मे) भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करार झाला. मात्र अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आपले 'नापाक' हल्ले सुरु ठेवले. गेल्या चार दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींचा आढावा घेवूया...
२६ एप्रिल २०२५रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर अत्यंत अचूक हल्ले केले. फक्त २६ मिनिटांत सुमारे १०० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नसली तरी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय नेत्यांना माहिती देताना १०० चा आकडा नमूद केला होता. टार्गेट्सची निवड विश्वसनीय गुप्तचर माहिती आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांवरून करण्यात आली होती.
भारताने लक्ष्य केलेल्या दहशतवादी तळांपैकी पाच ठिकाणे पीओकेमधील नियंत्रण रेषेपासून ९ ते ३० किमी अंतरावर होती, तर उर्वरित पाकिस्तानमधील सीमारेषेपासून ६ ते १०० किमी दरम्यान होत्या. या कारवाईत राफेलवरून लॉन्च करण्यात आलेल्या स्काल्प क्रूज क्षेपणास्त्रांचा, हैमर स्मार्ट शस्त्रांचा, गाइडेड बॉम्ब, एक्सकॅलिबर गोळ्यांनी सज्ज M777 होवित्झर तोफींचा आणि आत्मघातकी ड्रोनचा वापर करण्यात आला. पाकिस्तानकडून येणाऱ्या हवाई धोक्यांना रोखण्यासाठी भारताने एस-400 ट्रायम्फ, आकाश मिसाईल, बराक-8 प्रणाली, विविध ड्रोनविरोधी प्रणाली अशा अनेक संरक्षण तंत्रज्ञानांची तैनाती केली.
पाकिस्तानने ८ मे रोजी भारतातील १५ शहरांवर मिसाईल आणि ड्रोनहल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय लष्कराने ते हल्ले निष्फळ ठरवले. भारताने केलेल्या कारवाईत लाहोर आणि कराची येथील पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेला मोठे नुकसान झाले आहे.
८-९ मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर भागातील लेह, जम्मू, बठिंडा पासून पश्चिमेकडील सर क्रीकपर्यंत ३६ ठिकाणी ३००-४०० तुर्की बनावटीचे सशस्त्र ड्रोन वापरून हल्ला केला. बहुतेक ड्रोन भारतीय लष्कराने पाडले. दुसऱ्या दिवशी, पाकिस्तानने एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले, पण भारताने त्यांनाही निष्प्रभ केले.
१० मे रोजी भारताने पाकिस्तानमधील आठ लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. यात विमानतळ, रडार युनिट्स आणि दारुगोळ्याचे गोदामांचा समावेश होता. पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी आणि नागरी संरचनेवर झालेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात करण्यात आले. भारतीय हवाई दलाने रफिकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर, चुनियन, पसरूर आणि सियालकोट येथील लष्करी तळांवर हल्ले केले. हे भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील सर्वात मोठी कारवाई ठरली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले होते की, “ भारताने केलेल्या कारवाईत स्कार्दू, सरगोधा, जैकोबाबाद आणि भोलारीसारख्या पाकिस्तानी एअरबेसला मोठे नुकसान झाले आहे. रडार आणि हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राची सुरक्षा अपुरी झाली आहे. एलओसीच्या पलीकडे लष्करी पायाभूत सुविधा, कमांड केंद्रे आणि रसद केंद्रांवर झालेल्या अचूक हल्ल्यांमुळे त्यांच्या संरक्षण आणि आक्रमण क्षमतांवर मोठा परिणाम झाला आहे.”
गेल्या चार दिवसांत परिस्थितीत मोठे बदल झाले. भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ, हवाई दलाच्या छावण्या आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. तसेच पाकिस्तानने भारतातील नागरी क्षेत्रे आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रयत्नही हाणून पाडला आहे.
शनिवारी (१० मे) भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करार झाला. मात्र अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर आगळीक केली. भारतानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता सीमावर्ती जिल्ज़्यांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.