Operation Sindoor impact : भारताच्या तडाख्याने पाकिस्तान धास्तावले, 'PSL'चे १० सामने कराचीत हलवले
Operation Sindoor impact : भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचा धसका पाकिस्तानने घेतला आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या दहाव्या हंगामातील उर्वरित सर्व सामने कराचीत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गद्दाफी स्टेडियम येथे झालेल्या आपत्कालीन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पीएसएल फ्रँचायझी मालक आणि सुरक्षा दलांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.
रावळपिंडीतील आजचा सामना रद्द
पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा महत्त्वाच्या टप्प्यावर असून, संभाव्य सुरक्षेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे पीसीबीने म्हटले आहे. सर्वांशी सल्लामसलत करून कराचीत उर्वरित सामने खेळवण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणारा कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यातील 27 वा सामना रद्द करण्यात आला असून, तो कराचीत नव्याने नियोजित केला जाणार आहे. 'पीएसएल'चा अंतिम सामना १८ मे रोजी खेळला जाणार आहे.
इंग्लंडचे क्रिकेटपटू मायदेशी परतणार?
टेलिग्राफ स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनने बुधवारी सकाळी आपत्कालीन बैठक घेतली. या वर्षीच्या PSL मध्ये जेम्स विन्स, टॉम करन, सॅम बिलिंग्ज, क्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, ल्यूक वूड आणि टॉम कोहलर-कॅडमोर हे सात इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळत आहेत. क्रिकेटपटू वगळता PSL फ्रँचायझींचा भाग असलेले रवी बोपारा आणि अलेक्झांड्रा हार्टले यांच्यासह इंग्लंडचे प्रशिक्षक देखील आहेत. अनेक जण त्यांचे पर्याय शोधत आहेत आणि ते घरी परतू शकतात."

