मॉस्को : पुढारी ऑनलाईन
लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत- चीनच्या संबंधात तणाव आहे. याच दरम्यान आता चीनने आणखी एक नापाक हरकत केल्याचे समोर आले आहे. भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी चीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरोधात अप्रचार सुरु केला आहे. चीन सरकारचे मुखपत्र पीपल्स डेलीने रशियाने भारताला शस्त्रास्त्रे विकू नयेत, असा सल्ला दिला आहे.
वाचा : पाकला दणका! दिल्ली दूतावासातील निम्मे कर्मचारी कमी करण्याचे आदेश
पीपल्स डेली या वृत्तपत्राने सोसायटी फॉर ओरिएंटल स्टडीज ऑफ रशिया या फेसबुकवरील ग्रुपवर याबाबत पोस्ट लिहिली आहे. रशियन भाषेत ही पोस्ट आहे. "भारत आणि चीनच्या लोकांचा रोष कमी करायचा असेल तर भारताला शस्त्रास्त्रे न विकणेच चांगले. दोन आशियाई देश रशियाचे निकटचे सामरिक भागीदार आहेत", असे फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले आहे. लडाखमधील चीन आणि भारत सैन्यांच्या संघर्षानंतर भारत मिग २९ आणि १२ सुखोई ३० एमके सह ३० लढाऊ विमाने खरेदी करणार आहे, असेही पुढे नमूद केले आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
वाचा : भारत आणि चीनला तिसरा पक्ष नकोच!
याच दरम्यान सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर आहेत. भारताच्या तिन्ही सैन्य दलाची पथके रशियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होत आहेत. भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा हा दौऱ्या महत्वाचा मानला जात आहे. चीनला प्रत्युत्तर देण्याची सर्व तयारी भारताने केली आहे. भारताला लवकर शस्त्र उपकरणे पुरविण्याची विनंती या दौऱ्यात केली जाणार असल्याचे समजते.