Pakistan PM Shehbaz Sharif : अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले 'नापाक' मनसुबे दाखवले आहेत. यानंतर शनिवारी (१० मे) रात्री ११.३० वाजता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारतावर निराधार आरोप केले. भारतानेच पाकिस्तानवर युद्ध लादण्याचा हास्यास्पद दावाही त्यांनी केला आहे. शरीफ यांनी सुमारे १२ मिनिटे केलेल्या भाषणातील प्रत्येक शब्दांमध्ये त्यांचा भारत व्देष दिसला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे निमित्त करत भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचा निराधार आरोपही त्यांनी केला.
भारताच्या हल्ल्यात २६ निष्पाप पाकिस्तानी नागरिक शहीद झाले आहेत. यामध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलाने आपल्या हद्दीत राहून शत्रूची विमाने नष्ट केली. आपण पुन्हा एकदा भारतावर मात केली, असे अत्यंत निराधार विधाने करत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना सलाम करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. हे युद्ध संपेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. आपण एक सैन्य तयार करू आणि शत्रूशी लढू आणि त्याला पराभूत करू, अशी वल्गनाही त्यांनी केली.
भारत कोणताही निर्णय एकतर्फी घेऊ शकतो; पण त्यामुळे वास्तव बदलणार नाही. दहशतवादामुळे सर्वात जास्त त्रासलेला देश पाकिस्तान आहे. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात आपण ९० हजार लोक गमावले आहेत. १५२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. पहलगाम हल्ल्याच्या बहाण्याने पाकिस्तानवर हल्ला करणे निराधार आहे. शांतताप्रिय देश म्हणून, पाकिस्तानने पहलगाम घटनेची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते; पण भारताने कायद्याचे पालन केले नाही आणि चुकीचा मार्ग स्वीकारला. जम्मू आणि काश्मीरमधील आमच्या बांधवांना त्यांचे हक्क मिळत नाहीत तोपर्यंत तो तसाच राहील, अशी पोकळ धमकही त्यांनी दिली. तसेच यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याबद्दल त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताविरुद्ध पाठिंबा दिल्याबद्दल सौदी अरेबिया, तुर्की आणि चीनचे आभार मानले.
भारतात, परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सायंकाळी ६ वाजता युद्धबंदीची माहिती दिली होती;पण अवघ्या ३ तासांत पाकिस्तानने सीमवर्ती जिल्ह्यांमध्ये गोळीबार आणि ड्रोन हल्ले करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामुळे शनिवारी रात्री अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट लागू करावा लागला. याचवेळी पाकिस्तानने दावा केला की पेशावरमध्ये एक भारतीय ड्रोन दिसला. यानंतर पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली. या यंत्रणेने भारतीय ड्रोन पाडले आहे.