

दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत शत्रु राष्ट्र पाकिस्तानला एकामागून एक धक्के देत आहे. आता भारताने देशांतर्गत व्यापाराबाबत मोठे पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात- निर्यातीवर बंदी घातली आहे. म्हणजे भारताने दोन्ही देशातील व्यापार पूर्णपणे थांबवला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधी कडक कारवाई सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी करार रद्द केला, भारतातील पाकिस्तानी अधिकारी आणि नागरिकांना भारत सोडण्यास सांगितले. पाकिस्तानी मीडिया तसेच सोशल मीडिया चॅनेल्सवर बंदी घातली आहे. अटारी बॉर्डर बंद केली. भारताने पाकिस्तानविरोधात यांसारखे महत्त्वपूर्ण पावले उचलत, पाकिस्तानची कोंडी केली आहे.
भारताने पाकिस्तानमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानमधून थेट आयात कमी झाली असली तरी, काही वस्तू अप्रत्यक्ष मार्गांनी किंवा तिसऱ्या देशांमधून देशात येत होत्या. त्यामुळे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतला. मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, परराष्ट्र व्यापार धोरणात (FTP) नव्याने जोडलेल्या तरतुदीमध्ये "पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमध्ये उद्भवणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूकीवर तात्काळ बंदी" घालण्याचा उल्लेख आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी, भारत आयएमएफ (IMF), जागतिक बँक (WB) आणि आशियाई विकास बँकेकडून (ADB) पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी करेल. पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत दहशतवादाला चालना देण्यासाठी वापरली जात असल्याचा भारताचा आरोप आहे, त्यामुळे पाकिस्तानला देण्यात येणारा निधी थांबवला जाईल. पाकिस्तानवर आर्थिक दबाव आणण्यासाठी भारत पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) 'ग्रे लिस्ट'मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल. जूनमध्ये होणाऱ्या FATF बैठकीत भारत ही मागणी करणार आहे.