अमेरिकेने भारताला सागरी सुरक्षा तंत्रज्ञान (Indo-Pacific Maritime Domain Awareness software) आणि उपकरणे विकण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. हा करार इंडो-पॅसिफिक मेरीटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश भारताच्या सागरी सीमांवर देखरेख आणि सुरक्षा मजबूत करणे आहे. १३ कोटी १० लाख डॉलर्सचा हा करार आहे. भारताने अमेरिकेकडून सी व्हिजन सॉफ्टवेअर, टेक्निकल असिस्टन्स फील्ड टीम (TAFT) प्रशिक्षण, रिमोट सॉफ्टवेअर आणि अॅनालिटिकल सपोर्ट आणि इतर उपकरणे खरेदी करण्याची विनंती केली होती. 'डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतासाठी १३१ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या प्रमुख सागरी तंत्रज्ञानाच्या विक्रीला मान्यता दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने इंडो-पॅसिफिक सागरी डोमेन जागरूकता आणि संबंधित घटकांच्या विक्रीला हिरवा कंदील दाखवला आहे,' अशी माहिती अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने यूएस काँग्रेसला दिलेल्या अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहे.
या करारामुळे भारताच्या नौदलाला मोठी चालना मिळणार आहे. सी व्हिजन सॉफ्टवेअर हे एक वेब-आधारित सॉफ्टवेअर आहे जे समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवते. त्यात भारताच्या गरजांनुसार काही विशेष सुधारणांचाही समावेश आहे. हे सॉफ्टवेअर सागरी सीमांमध्ये जहाजांच्या हालचाली, बेकायदेशीर क्रियाकलाप आणि पर्यावरणीय धोक्यांवर लक्ष ठेवण्यास मदत करते. भारतीय नौदल आणि इतर दलांना या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करता यावा यासाठी तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण (TAFT) मधील अमेरिकन तज्ञांची एक टीम भारतात प्रशिक्षण देईल.
या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढेल. अमेरिका भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार मानते जे इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे. यूएस डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (DSCA) नुसार, या कराराचा प्रादेशिक लष्करी संतुलनावर परिणाम होणार नाही आणि त्यामुळे भारतात अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांच्या तैनातीची आवश्यकता भासणार नाही.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे. तपास संस्थांच्या मते, या हल्ल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले होते, मात्र पाकिस्तानने हे आरोप फेटाळले आहेत. भारतीय लष्करानुसार गेल्या सात दिवसांत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर १७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.