

Pakistan Share Market Crash
इस्लामाबाद/कराची : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा थेट परिणाम गेल्या काही दिवसांत पाकिस्तान शेअर बाजारावर दिसून आला आहे. बुधवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये (PSX) 2000 हून अधिक अंकांनी मोठी घसरण झाली.
पाकिस्तानातील राजकीय, लष्करी आणि आर्थिक वातावरणात अस्थिरता स्पष्टपणे दिसून येत आहे. येणारे काही दिवस पाकिस्तानसाठी निर्णायक ठरू शकतात.
कराची स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख ‘KSE-100’ निर्देशांक 1717.35 अंकांनी म्हणजेच एकूण 1.5 टक्क्यांनी घसरला आणि 113154.83 या पातळीवर पोहोचला. सकाळी 10.38 वाजेपर्यंत निर्देशांकात 2073.42 अंकांची (1.8 टक्के) घसरण नोंदवली गेली.
PSX मध्ये ही घसरण भारताकडून लष्करी कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे झाली असल्याचे तज्ज्ञ सांगताहेत. गेल्या काही दिवसांत भारताने पाकिस्तानबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची भावना भारतीयांमध्ये आहे.
त्यामुळेच आगामी काही काळामध्ये भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई करू शकतो. कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकते. या शक्यतांमुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारात भीतीचे वातावरण आहे.”
पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्ला तारार यांच्या पत्रकार परिषदेनंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. पाकिस्तानी शेअर बाजार मोठ्या दडपणाखाली आहे. पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ग्राहकांची संख्या रोडावली
भारतासोबत राजनैतिक आणि लष्करी तणाव वाढल्यामुळे सर्वच व्यवसाय क्षेत्रात मोठी अनिश्चित्तता आहे. या आठवड्यात बाजारपेठा आणि शॉपिंग सेंटर्समध्ये ग्राहकांची संख्या प्रचंड रोडावल्याचे दिसून आले आहे. पुढे काय होईल? याची चिंता सर्वंनाच लागून राहिली आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू
यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर राजनैतिक संबंध कमी केले
पाकिस्तानचे लष्करी अधिकारी हाकलले गेले
1960 मधील सिंधू पाणी वाटप करार रद्द
शिमला करार रद्द
अटारी लँड ट्रान्झिट पोस्ट (वाघा बॉर्डर) तात्काळ बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण अधिकाऱ्यांना “पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य” दिले
या घटनाक्रमाने पाकिस्तानातील तणाव वाढला आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तारार यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत दावा केला की, “भारताकडून २४–३६ तासांत लष्करी कारवाई होऊ शकते.” त्यांनी असेही सांगितले की पाकिस्तानकडे याबाबत विश्वसनीय गुप्तचर माहिती आहे.