

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक करण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे भारतात ही सामग्री उपलब्ध नाही. सरकारच्या विनंतीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया गुगल ट्रान्सपरन्सी रिपोर्टला भेट द्या, असा संदेश पाकिस्तानी पंतप्रधानांच्या चॅनलवर वाचायला मिळाला. दरम्यान, भारत सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला भारताबद्दल खोटे, प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री प्रसारित केल्याच्या आरोपाखाली १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. पहलगाम हल्ल्यावरील बीबीसीच्या वृत्तावरही तीव्र आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी अर्थमंत्री ख्वाजा आसिफ आणि पाकिस्तानी लष्कराची प्रचार शाखा असलेल्या आयएसपीआरचेही यूट्यूब चॅनल भारताने ब्लॉक केले आहे.
भारत सरकारने केवळ पाकिस्तानी नेत्यांच्या समाज माध्यमांवर नव्हे तर खेळाडू, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि वृत्तवाहिन्यांवरही कारवाई केली आहे. ब्लॉक केलेल्या प्रमुख यूट्यूब चॅनेलमध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर, पत्रकार आरजू काझमी आणि समालोचक सय्यद मुझम्मिल शाह यांच्या चॅनेलचा समावेश आहे.
पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू अर्शद नदीमचे इंस्टाग्राम खाते आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे यूट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, हरिस रौफ, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदी यांचे इंस्टाग्राम अकाउंटही ब्लॉक केले आहेत.