नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले. आज (दि.२) त्यांनी आयोगाच्या केंद्रीय कार्यालयात अध्यक्षपदाचा पदाभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, देशभरात इतर मागासवर्गात जवळपास अडीच हजार जाती आहेत. पोट जातींना धरून ५ हजार ५०० जाती इतर मागासवर्गात मोडतात. देशातील बहुतेक सर्वच राज्यांमध्ये मोठया संख्येने इतर मागासवर्ग जातीत मोडणारे लोक आहेत. या सर्वांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकासासाठी मागासवर्ग आयोग कार्यरत असून तो अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अहीर यावेळी म्हणाले.
यासह शासनाच्या योजनांचा लाभ देशातील सर्वच स्तरातील मागासवर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या देशातील विषमता, असमानता संपविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भारतीय संविधानात हे अंर्तभूत आहे. त्याचप्रमाणे इतर मागास जातीतील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा पुनरुच्चार अहीर यांनी केला.
हेही वाचलंत का ?