Ricky Ponting Heart Scare | लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल | पुढारी

Ricky Ponting Heart Scare | लाईव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

पर्थ (ऑस्ट्रेलिया : पुढारी ऑनलाईन; ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याला अचानक छातीत दुखू लागल्याने (Ricky Ponting Heart Scare) ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी समालोचन (कॉमेंट्री) करताना रिकी पॉटिंगची तब्येत बिघडली. यामुळे त्याला समालोचन थांबवावे लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, पर्थ येथील सामन्याच्या तिसर्‍या दिवशी पॉटिंगला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारी म्हणून तो रुग्णालयात दाखल झाला आहे. सेव्हनच्या प्रवक्त्याने सांगितले की, रिकी पॉटिंगची तब्येत बिघडल्याने तो आजच्या सामन्यात समालोचन करणार नाही.”

गेली दोन वर्षे ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी कठीण गेली आहेत. यावर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज क्रिकेटर रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेटने गमावले आहेत. (Ricky Ponting Heart Scare)

प्रकृती स्थिर

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या सहकाऱ्यांनी पाँटिंगची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे. पाँटिंग आता सामन्यात समालोचन करणार नाही. रिपोर्ट्सनुसार, पाँटिंगने अस्वस्थ वाटू लागल्याचे सहकाऱ्यांना सांगितले आणि तसेच छातीत दुखत असल्याची काही लक्षणे जाणवल्यानंतर तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

सप्टेंबर २०२० मध्ये आणखी एक ऑस्ट्रेलियन फलंदाज डीन जोन्स यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले होते. याशिवाय पश्चिम ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक आणि नेदरलँड्सचे प्रशिक्षक रेयान कॅम्पबेल यांनाही या वर्षी एप्रिलमध्ये ह्रदयविकाराचा झटका आला होता ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पाँटिंगची यशस्वी कारकीर्द

पाँटिंगने १६८ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ४१ शतके आणि ६२ अर्धशतकांसह ५१ च्या सरासरीने १३,३७८ धावा केल्या आहेत. त्याने ३७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२.०३ च्या सरासरीने १३,७०४ धावा केल्या आहेत. ज्यात ३० शतके आणि ८२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १७ T20 सामन्यात २८.६४ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतके आहेत. १९९९, २००३ आणि २००७ मध्ये सलग तीन विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात त्याचा सहभाग होता. ज्यामध्ये त्याने कर्णधार म्हणून दोन स्पर्धांमध्ये संघाला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा :

Back to top button