

Viral Campus Fight Video: महागड्या खासगी विद्यापीठांमध्ये घडणाऱ्या घटनांबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दोन तरुणींमधील भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यापीठाच्या परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @mujifren या युजरने शेअर केला. या पोस्टमध्ये वर्षाला सुमारे १० लाख रुपये फी असलेल्या खासगी विद्यापीठात विद्यार्थ्यांना कधी कंटाळा येत नाही, अशी उपरोधिक टिप्पणी करण्यात आली आहे. पोस्टमध्ये हा प्रकार हरियाणातील सोनीपत येथे असलेल्या O.P. Jindal Global University मध्ये घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये दोन तरुणींच्या गटामध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसत आहे. काही क्षणांतच हा वाद वाढला आणि विद्यार्थिनी एकमेकींचे केस ओढताना तसेच ढकलाढकली करताना दिसतात. मात्र या भांडणाइतकचं बाजूला बसलेल्या विद्यार्थ्याची चर्चा होत आहे.
व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी मोबाईलवर हा प्रकार शुट करताना दिसतात. काही जण तर मागून “मारो, मारो” असं ओरडत भांडणाला प्रोत्साहन देत असल्याचेही ऐकू येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
दरम्यान, या गोंधळात एका वेगळ्याच कारणामुळेही व्हिडिओ चर्चेत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी व्हिडिओमधील एका तरुणाकडे लक्ष वेधले. हा तरुण अगदी जवळ उभा राहून शांतपणे शोरमा खात असल्याचे दिसते. आजूबाजूला गोंधळ सुरू असतानाही तो शोरमा खात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंटरनेटवर त्याच्याबद्दल विनोदी प्रतिक्रिया दिसत आहेत.
या व्हिडिओमुळे खासगी विद्यापीठांच्या कल्चरबाबतही मोठा वाद निर्माण झाला आहे. काही जणांचे मत आहे की, पालक लाखो रुपये फी भरून मुलांना अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात, तेव्हा विद्यार्थ्यांकडून शिस्तबद्ध वर्तनाची अपेक्षा असते. अशा प्रकारच्या भांडणांमुळे त्या संस्थांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
तर दुसरीकडे काही जणांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या प्रसंगाचा व्हिडिओ शुट करून तो व्हायरल करणे कितपत योग्य आहे, असा सवालही काहींनी उपस्थित केला. अशा प्रसंगात परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी लोकांनी व्हिडिओ काढणे आणि सोशल मीडियावर शेअर करणे ही चिंताजनक प्रवृत्ती असल्याचेही मत व्यक्त केले आहे.