

World Cup Proposal Viral Video: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. मैदानावर क्रिकेटचा रोमांच शिगेला पोहोचला असताना प्रेक्षकांमध्ये घडलेली एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामना सुरू असताना स्टेडियममध्ये बसलेल्या एका भारतीय चाहत्याने न्यूझीलंडच्या महिला चाहत्याला सर्वांसमोर प्रपोज केले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रसंगामुळे स्टेडियममध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. त्या चाहत्याने अचानक गुडघ्यावर बसून अंगठी पुढे करत आपल्या प्रेमाची कबुली दिली. हा अनपेक्षित क्षण पाहून आसपास बसलेले प्रेक्षकही क्षणभर आश्चर्यचकित झाले.
या रोमँटिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत क्रिकेटच्या मैदानावर घडलेला हा “वर्ल्ड कप प्रपोजल” असल्याचे म्हटले. काही चाहत्यांनी हा क्षण क्रिकेटइतकाच रोमांचक असल्याचेही म्हणले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, न्यूझीलंडची महिला चाहती सुरुवातीला थोडी आश्चर्यचकित होते, मात्र नंतर हसत त्या प्रपोजला सकारात्मक प्रतिसाद देते. यानंतर आसपासच्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दोघांचे अभिनंदन केले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
भारताच्या ऐतिहासिक विजयासोबतच या लव्ह स्टोरीनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा चाहत्यांचे उत्साहपूर्ण क्षण पाहायला मिळतात, पण असा प्रपोज क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील भारताचा विजय आणि या चाहत्याचा रोमँटिक प्रोपोज या दोन्ही गोष्टींमुळे हा सामना चाहत्यांच्या आठवणीत कायम राहणार असल्याचे क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर म्हणले आहे.