E20 Petrol: E20 पेट्रोलवर गडकरींचा यू-टर्न? कधी आव्हान, कधी स्पष्टीकरण, आता मायलेज कमी होण्याची कबुली, नेमकं खरं काय?

E20 Fuel Controversy: E20 पेट्रोलबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या चार विधानांमुळे पुन्हा चर्चा रंगली आहे.
Nitin Gadkari E20 Fuel Controversy
Nitin Gadkari E20 Fuel ControversyPudhari
Published on
Updated on

Nitin Gadkari E20 Fuel Controversy: देशभरात E20 पेट्रोलबाबत चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विविध विधानांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सुरुवातीला E20 हे भविष्यातील इंधन असल्याचा दावा, त्यानंतर वाहन खराब झाल्याचा एकही पुरावा नसल्याचे आव्हान, नंतर या विषयाचा आपल्या मंत्रालयाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण आणि आता संसदेत E20 मुळे काही वाहनांचे मायलेज 2 ते 6 टक्क्यांनी कमी होऊ शकते, अशी कबुली दिल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

'भविष्यातील इंधन' म्हणून E20 चे समर्थन

गेल्या वर्षी पुण्यात आयोजित वर्ल्ड बायोफ्यूल डे कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रित इंधनाला भारताच्या ऊर्जा सुरक्षेचे भविष्य असल्याचे सांगितले होते. त्यांनी E20 ला "फ्यूचरचं फ्यूल" संबोधत, भविष्यात डिझेलमध्येही जैवइंधनाचा वापर वाढवण्यावर भर दिला होता.

'एकही गाडी खराब झाली असेल तर नाव सांगा'

E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चेदरम्यान गडकरी यांनी टीकाकारांना खुले आव्हान दिले होते. "E20 मुळे एकही वाहन खराब झाले असेल तर त्याचे उदाहरण द्या," असे ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर E20 विरोधात चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही केला होता.

यानंतर सरकारने मारुती सुझुकी, टोयोटा, बजाज ऑटो, टीव्हीएस यांसारख्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन केली होती. या समितीने E20 मुळे वाहनांना कोणताही मोठा धोका नसल्याचे मत व्यक्त केले होते.

'E20 माझ्या मंत्रालयाचा विषय नाही'

यानंतर न्यायालयीन सुनावणीदरम्यान नितीन गडकरी यांनी E20 धोरणाचा संबंध त्यांच्या मंत्रालयाशी नसून तो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित येतो, असे स्पष्ट केले. कायदेशीरदृष्ट्या हे विधान योग्य असले, तरी E20 चा सर्वाधिक प्रचार करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी गडकरी असल्याने या वक्तव्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले.

जुन्या वाहनांमध्ये काही पार्ट्स बदलावे लागू शकतात

राज्यसभेत नुकत्याच दिलेल्या उत्तरात गडकरी यांनी 2005 ते 2016 दरम्यान उत्पादित BS-III वाहनांमध्ये E20 वापरण्यासाठी काही रबरचे पार्ट्स, सील आणि गॅस्केट बदलावे लागू शकतात, असे सांगितले. जुन्या वाहनांमध्ये वापरलेले काही रबर आणि प्लास्टिकचे भाग जास्त इथेनॉल असलेल्या इंधनाशी दीर्घकाळ सुसंगत नसल्याने कालांतराने त्यांची झीज होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मायलेज 2 ते 6 टक्क्यांनी कमी होण्याची कबुली

यानंतर संसदेत गडकरी यांनी आणखी एक महत्त्वाची बाब मान्य केली. त्यांनी सांगितले की, E20 पेट्रोल वापरल्यास वाहनांच्या मायलेजमध्ये 2 ते 6 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. मात्र, ही घट प्रत्येक वाहनात सारखी असेलच असे नाही. वाहनाचे इंजिन, तंत्रज्ञान आणि वय यानुसार त्यात फरक पडू शकतो.

जुन्या वाहनधारकांसाठी चिंता

सरकारने आता स्पष्ट केले आहे की, 2005 ते 2016 दरम्यानच्या BS-III वाहनांमध्ये रबर पाइप, सील आणि गॅस्केट यांसारख्या भागांवर E20 चा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा वाहनधारकांनी आवश्यक तांत्रिक तपासणी करून गरज भासल्यास संबंधित पार्ट्स बदलण्याचा विचार करावा.

Nitin Gadkari E20 Fuel Controversy
RERA Project: घर खरेदीदारांना मोठा धक्का! RERA प्रकल्पांना 4 महिन्यांची मुदतवाढ; फ्लॅटचा ताबा आता उशिरा मिळणार

स्पष्ट मार्गदर्शक सूचना नाहीत

E20 पेट्रोलचा वापर कोणत्या वाहनांसाठी योग्य आहे, जुन्या वाहनधारकांनी काय करावे आणि भविष्यात कोणत्या प्रकारचे वाहन खरेदी करावे, याबाबत सरकारकडून स्पष्ट आणि अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे. तोपर्यंत E20 संदर्भातील चर्चा आणि संभ्रम कायम राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news