

Nitin Gadkari E20 fuel statement BS3 vehicles
नवी दिल्ली: E20 पेट्रोलचा वाहनांच्या एकंदरीत कामगिरीवर कोणताही मोठा परिणाम होत नाही; मात्र, २००५ ते २०१६ या काळात उत्पादित झालेल्या 'BS-III' वाहनांमध्ये हे इंधन वापरल्यास काही रबरी भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज भासू शकते, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.
बुधवारी एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, इंडियन ऑइल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, BS-VI प्रकारच्या वाहनांमध्ये E20 इंधन वापरले तरी ती वाहने उत्सर्जनाचे सर्व नियम पूर्ण करतात.
गाड्या आणि दुचाकींच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता अभ्यासात आढळून आलेली नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. "E20 इंधनामुळे जुन्या वाहनांच्या कामगिरीत कोणताही मोठा फरक पडलेला नाही किंवा इंजिनची असामान्य झीज झालेली नाही, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. वाहनांचे ड्रायव्हिंग, इंजिन सुरू होणे, तसेच मेटल व प्लास्टिकच्या घटकांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही," असे ते म्हणाले. मात्र, २०१६ पूर्वी तयार केलेल्या BS-III वाहनांवरील चाचण्यांवरून असे दिसेत की, त्यांच्यातील काही रबरी भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज पडू शकते.
इंधनातील बदलामुळे मायलेजमध्ये होणारी किंचित घट ही ड्रायव्हिंगच्या सवयी, वेळेवर तेल व एअर-फिल्टर बदलणे, टायरमधील हवेचा दाब, व्हील अलाइनमेंट आणि एसीचा वापर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते, असे सरकारने स्पष्ट केले आहे.