

JKLM student protest : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित 'तिरंगा यात्रे'त सहभागी होण्यासाठी रुग्णालयातून बाहेर पडण्यापासून रोखल्यानंतर, उपोषणकर्ते विद्यार्थी कार्यकर्ते देवेंद्रनाथ महतो यांची शनिवारी रांचीतील रुग्णालयात पोलिसांशी जोरदार हुज्जत झाली. या झटापटीदरम्यान आपल्या छातीला दुखापत झाल्याचा दावा महतो यांनी केला आहे.झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात गेल्या २३ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून देवेंद्रनाथ महतो हे गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त स्टेडियमवर आयोजित 'तिरंगा यात्रे'त सहभागी होण्यासाठी महतो सदर रुग्णालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा (JKLM) या महतो यांच्या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना महतो यांना यात्रेत जाऊ देण्याची विनंती केली, तर अधिकारी उपोषणकर्त्या महतो यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवरील मोर्चात जाण्यापासून मला का रोखले जात आहे? असा सवाल महतो यांनी केला. "८० वर्षांनंतर आम्हाला केवळ नावापुरतेच स्वातंत्र्य मिळाले असल्याची जाणीव होत आहे. संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मला रोखले जात आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यानंतर महतो यांनी 'X' वर पोस्ट करत धक्काबुक्कीदरम्यान दुखापत झाल्याचा आरोप केला. त्यांनी लिहिलं की, "जयपाल सिंग स्टेडियमवर ध्वजारोहणासाठी जात असताना पोलिसांनी मला रोखले. यादरम्यान झालेल्या ढकलाढकलीत माझ्या छातीला दुखापत झाली आहे. सध्या माझ्यावर उपचार आणि वैद्यकीय तपासणी सुरू आहे."
गेल्या १४ दिवसांपासून आपली प्रकृती खालावलेली असून बोलतानाही छातीत दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही स्टेडियममध्ये जाऊन राष्ट्रध्वज फडकवण्याची आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. डॉक्टरांनी रुग्णालयातून बाहेर पडण्यास मनाई केली असेल, तर प्रशासनाने मला तसा लेखी आदेश दाखवावा, अशी मागणीही महतो यांनी केली. "डॉक्टरांचा आदेश असेल, तर मला तो लेखी स्वरूपात दाखवा. जर कोणत्याही लेखी आदेशाशिवाय मला रोखले गेले, तर मला रोखणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध मी गुन्हा दाखल करेन," असा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू होऊन महिना होत आला असताना काही लोक ते मोडून काढण्याचा आणि भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
झारखंड विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर प्रकृती बिघडल्याने महतो यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) द्वारे आयोजित भरती परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरीऐच्छिक उमेदवारांच्या समर्थनात महतो २ ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत.