

Sonipat wedding dispute : मला 'मारुती सुझुकी ब्रेझा'च हवी, असा अट्टहास धरत दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या वराने थेट लग्नच मोडले. वधुच्या वडिलांनी 'ह्युंदाई ऑरा'कार बुक केल्याची माहिती दिली. मात्र यावेळी नवरदेवाने 'मारुती सुझुकी ब्रेझा'ची मागणी केली. तसेच कार नको म्हणत तो चक्क वऱ्हाडात आलेल्यांना घेवून निघून गेला, तर वधू लग्नाच्या पोशाखात मंडपातच वाट पाहत राहिली. हा धक्कादायक प्रकार हरियाणातील सोनीपत येथे घडला आहे.
सोनीपतमधील रामनगर परिसरात राहणारे सुभाष कुमार यांनी याप्रकरणी सेक्टर २७ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सुभाष कुमार यांची मुलगी हिना हिचे लग्न गोहाना येथील गांधीनगरमध्ये राहणाऱ्या आणि दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या कुलदीप याच्याशी सहा महिन्यांपूर्वी ठरले होते. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने २० नोव्हेंबर रोजी लग्नाची तारीख निश्चित झाली होती. मुलीच्या घरच्यांनी मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी करत नातेवाईकांना निमंत्रणेही धाडली होती.
सुभाष कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यापूर्वी लग्न जमवणाऱ्या अनिल आणि राजेश या मध्यस्थांचा त्यांना फोन आला. मुलीच्या घरच्यांनी नवरदेवासाठी कारची व्यवस्था केली आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर सुभाष यांनी नवरदेवासाठी कार बुक केल्याचे सांगितले. मात्र, काही वेळातच अनिलने पुन्हा फोन करून कुलदीपला 'ह्युंदाई ऑरा' ही कार पसंत नसल्याचे कळवले. 'ऑरा' ही गाडी सर्रास टॅक्सी म्हणून वापरली जाते, त्यामुळे त्याऐवजी 'ब्रेझा' कार हवी आहे, असा निरोप देण्यात आला.
नवरदेवाचा हट्ट पुरवण्यासाठी सुभाष कुमार यांनी तातडीने साडेनऊ लाख रुपये किमतीच्या 'ऑरा' कारचे बुकिंग रद्द केले. त्यांनी सोनीपत आणि आसपासच्या अनेक शोरूममध्ये जाऊन 'ब्रेझा' कार मिळवण्यासाठी धावपळ केली. परंतु, लग्नाला अवघे काही तास शिल्लक असल्याने गाडी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यानंतर नवरदेवाच्या घरच्यांनी बाहेरुन कार मागवण्याबाबत चर्चा सुरू केली.
मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी कुलदीपसाठी दोन तोळ्यांची सोन्याची चेन, त्याच्या आईसाठी चार तोळ्यांचे सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण तयार केले होते. तसेच नवरदेवाचा मोठा भाऊ आणि वहिनीसाठीही सोन्याचे दागिने घेतले होते. याशिवाय सुमारे १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे उत्तम दर्जाचे फर्निचर आणि घरगुती साहित्यही तयार ठेवण्यात आले होते. लग्नासाठी 'मामचंद वाटिका' बुक करून सुमारे १,२०० पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण लग्नसोहळ्यासाठी वधूपित्याने २५ ते ३० लाख रुपये खर्च केले होते.
२० नोव्हेंबर रोजी लग्नाच्या दिवशी 'ब्रेझा' कारची व्यवस्था होऊ न शकल्याने कुलदीप लग्नाच्या पोशाखात येण्याऐवजी साध्या कपड्यांतच आपल्या आईसोबत विवाहस्थळी दाखल झाला. यावेळी नवरदेवाच्या कुटुंबीयांनी मुलीकडच्या नातेवाईकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कुलदीपच्या वहिनीने स्वतः वकील असल्याची ओळख सांगत न्यायालयात खेचण्याची धमकी दिली, तर कुलदीपने दिल्ली पोलिसात असल्याचा रुबाब दाखवत अरेरावी केली. या वादानंतर कुलदीपने आपल्यासोबत आलेल्या सुमारे ३० वऱ्हाड्यांसह लग्नमंडप सोडला. नवरदेव निघून गेल्याने हिनाला नवरीच्या वेशातच मंडपात बसून राहावे लागले.
हिना ही एम.ए. (MA) आणि जेबीटी (JBT) पदवीधर असून कुलदीपचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. लग्न ठरवताना नवरदेवाच्या घरच्यांनी कोणतीही मागणी करणार नाही आणि हुंडाही घेणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, लग्नाच्या तोंडावर कार आणि दागिन्यांची मागणी करण्यात आली, असा आरोप सुभाष कुमार यांनी केला आहे.
वरात परतल्यानंतर सुभाष कुमार यांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. नवरदेवाच्या बाजूनेही हेल्पलाइनवर संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर वधूपक्षाने सेक्टर २७ पोलीस ठाण्यात धाव घेत कुलदीप आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध लेखी तक्रार दिली. तक्रार प्राप्त झाली असून चौकशीसाठी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सेक्टर २७ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सवित कुमार यांनी दिली.