

परळी वैजनाथ : लग्नात योग्य मानपान केला नाही तसेच माहेरहून स्कोर्पिओ गाडी खरेदीसाठी १० लाख रुपये आणले नाहीत, या कारणावरून ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम बालाजी आडे (वय ३०, मूळ रा. कोठाळा वंजारवाडी, ता. सोनपेठ, जि. परभणी, सध्या रा. मालेवाडी, ता. परळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती बालाजी मोतीराम आडे, सासू शेषाबाई मोतीराम आडे, सासरे मोतीराम आडे, नणंद शांता बालू जाधव, नंदावा बालू शंकर जाधव आणि सवत मनिषा बालाजी आडे (सर्व रा. वंजारवाडी, ता. सोनपेठ, जि. परभणी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, लग्नात मुलीच्या आई-वडिलांनी योग्य मानपान केला नसल्याचा आरोप करत आरोपींनी संगनमताने विवाहितेचा छळ सुरू केला. त्यानंतर माहेरहून स्कोर्पिओ गाडी खरेदीसाठी १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून ते ५ जून २०२६ पर्यंत विवाहितेला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता.
माहेरहून पैसे आणण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिचा छळ सुरूच ठेवण्यात आला. अखेर या त्रासाला कंटाळून विवाहितेने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
परळी ग्रामीण पोलिसांनी ३० जून २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टोले पुढील तपास करीत आहेत.