

Delhi blast Mumbai link: दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या तपासाला नवे वळण लागले असून या प्रकरणाचे मुंबईशी महत्त्वाचे कनेक्शन उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरून तीन उच्चशिक्षित संशयितांना गुप्त ऑपरेशनद्वारे ताब्यात घेतले असून सध्या त्यांची दिल्लीमध्ये चौकशी सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या तिघांचा दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींशी एका विशिष्ट, एन्क्रिप्टेड अॅप्लिकेशनद्वारे नियमित संपर्क होता. हे अॅप अत्यंत सुरक्षित सिस्टीमवर चालत असल्याने त्यावरील मेसेज तपास यंत्रणांना शोधणे कठीण होते. या अॅपवरील चॅट, कॉल लॉग्स आणि फाइल्स सध्या डिजिटल फॉरेन्सिक टीम तपासत आहे.
तिघांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिस, केंद्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलिसांनी अत्यंत गोपनीय ऑपरेशन राबवले. या कारवाईत तीन वेगवेगळ्या भागांतून तीन सुशिक्षित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. आणि त्यांना ताबडतोब विमानाने दिल्लीला हलवण्यात आले.
दिल्लीतील विशेष तपास पथक तिघांकडून खालील माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे
आरोपींशी चर्चा कधी झाली?
संपर्क का करण्यात आला होता, फक्त माहितीपुरता की आणखी काही?
दिल्लीतील बॉम्बस्फोटाशी त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का?
आर्थिक व्यवहार किंवा डिजिटल पुरावे आढळतात का?
कोणाच्या इशाऱ्यावर त्यांनी संपर्क साधला?
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या तिघांच्या डिजिटल डिव्हाईसमधून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
ताब्यात घेतलेले तिन्ही संशयित सुशिक्षित आणि उत्तम आर्थिक पार्श्वभूमीचे असल्याने तपास यंत्रणांची चिंता आणखी वाढली आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात आहे. डिजिटल पुरावे, आर्थिक धागेदोरे आणि संवादांच्या तपशीलांचा आधार घेऊन आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
तपास यंत्रणांनी अधिकृतरीत्या या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला असला, तरी मुंबईतून तिघांना ताब्यात घेतल्याने तपास आणखी वाढणार आहे.