

Narayan Murthy 70 hour week: इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीयांनी आठवड्याला 70 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यांच्या या मतावर त्यावेळी जोरदार टीकाही झाली होती. मात्र आता मूर्ती यांनी पुन्हा एकदा तोच सल्ला देत चीनच्या वर्क कल्चरचे उदाहरण देत हा मुद्दा परत पुढे आणला आहे.
अलीकडील एका मुलाखतीत बोलताना मूर्ती यांनी चीनमधील “9-9-6 मॉडेल”चा संदर्भ देत म्हटले की, भारताला आर्थिकदृष्ट्या पुढे जायचे असेल, तर विशेषतः तरुणांनी जास्त वेळ काम करणे गरजेचे आहे.
चीनमधील अनेक टेक कंपन्यांमध्ये वर्षानुवर्षे “9-9-6 वर्क कल्चर” होते. या मॉडेलनुसार कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9 अशा 12 तासांची ड्युटी करत. आठवड्यात 6 दिवस ही ड्युटी करावी लागत. म्हणजे आठवड्याला तब्बल 72 तासांचे काम करत.
अलीबाबा, हुवावे यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये हे मॉडेल मोठ्या प्रमाणावर वापरले जात असे आणि चीनच्या झपाट्याने वाढलेल्या अर्थव्यवस्थेच्या मागे हेच मॉडेल असल्याचे अनेकांचे मत होते. पण
• वर्क-लाइफ बॅलन्सचा अभाव
• वाढता मानसिक आणि शारीरिक त्रास
• कर्मचाऱ्यांवरील ताण
या कारणांमुळे या मॉडेलवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. 2021 मध्ये चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने हे मॉडेल अवैध ठरविले. तरीही अनेक ठिकाणी हे नियम अद्याप पाळले जात असल्याचे अहवाल सांगतात.
मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, भारताचा सध्याचा आर्थिक वाढ दर 6.5 टक्के आहे, जो वाईट नाही;
परंतु चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा सुमारे सहापट मोठी आहे. त्यामुळे देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी, विशेषतः कामगार आणि तरुण वर्गाने अधिक योगदान दिले पाहिजे. त्यांनी सांगितले की “यश मिळवण्यासाठी वर्क-लाइफ बॅलन्सची चिंता करण्यापूर्वी करिअरवर लक्ष देणं आवश्यक आहे.”
मूर्ती यांनी 2023 मध्येही राष्ट्रनिर्माणासाठी भारतीयांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवे, असे मत व्यक्त केले होते. आता त्यांनी हा मुद्दा पुन्हा अधोरेखित करत चीनचे उदाहरण देत देशातील तरुणांना अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. नारायण मूर्तींचे हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असून, तरुणांनी अधिक वेळ काम करावे की नाही, या मुद्द्यावर आता पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे .