

दावोस : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. दरम्यान, भारताच्या भविष्याचे ‘पॉवर हाऊस’ म्हणून महाराष्ट्र जागतिक उद्योगविश्वाला साद घालत आहे, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी झाले आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रांसाठी अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’च्या माध्यमातून उद्योजक, गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दावोस येथे उपस्थित आहेत. दावोसमधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रांतील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरू केले.
यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरू झाल्याने ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 14 लाख 50 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या 19 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलादनिर्मिती, आयटी-आयटीईस, डेटा सेंटर्ससह ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रांतील ही गुंतवणूक आहे. मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात ही गुंतवणूक येणार असून, त्यामुळे या भागांत उद्योगवाढीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदानप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत ‘वॉर रूम’च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल. भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज असलेला विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे स्वागत करीत आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन होईल, भारताच्या भविष्याचे ‘पॉवर हाऊस’ म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योगविश्वाला साद घालत आहे, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
पहिल्या दिवशी झालेले सामंजस्य करार पुढीलप्रमाणे महाराष्ट्र सरकार-कार्लसबर्ग
क्षेत्र : अन्न प्रक्रिया आणि कृषी
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 750
महाराष्ट्र सरकार-योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.
क्षेत्र : नवीनीकरणीय ऊर्जा
गुंतवणूक : 4 हजार कोटी
रोजगार : 6 हजार
ठिकाण : पालघर/एमएमआर
महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स
क्षेत्र : स्टील
गुंतवणूक : 565 कोटी
रोजगार : 847
ठिकाण : पालघर/एमएमआर
एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी
गुंतवणूक : सुमारे 8 बिलियन डॉलर
रोजगार : 80 हजार
एमएमआरडीए-के. रहेजा
गुंतवणूक : सुमारे 10 बिलियन डॉलर
रोजगार : एक लाख
एमएमआरडीए-अल्ट्रा कॅपिटल/पंचशील
गुंतवणूक : सुमारे 25 बिलियन डॉलर
रोजगार : 2 लाख 50 हजार
एमएमआरडीए-एसबीजी समूह
क्षेत्र : लॉजिस्टिक्स
गुंतवणूक : सुमारे 20 बिलियन डॉलर
रोजगार : 4 लाख 50 हजार
एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल
गुंतवणूक : सुमारे 8 बिलियन डॉलर
रोजगार : 80 हजार
एमएमआरडीए-जायका
धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर
एमएमआरडीए-सेम्बकॉर्प
डेव्हलपमेंट लि., सिंगापूर
एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर
एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी
शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली
महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात
क्षेत्र : स्टील
गुंतवणूक : 20 हजार कोटी
रोजगार : 8 हजार
ठिकाण : गडचिरोली
महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स
क्षेत्र : आयटी, डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 1 लाख कोटी
रोजगार : 1 लाख 50 हजार
येत्या दोन दिवसांत दावोसमध्ये एआय, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यासह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर, जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योगघटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, बोलणी-चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर, कोका-कोला, आयकिया, स्कोडा ऑटो आदी कंपन्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.फ