

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये शिवसेनेचे भव्य पक्ष कार्यालय आहे. परंतु यावेळी त्यांच्या नगरसेवकांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या भव्य कार्यालयाचे दोन भाग करण्यात येणार असून एक ठाकरेंच्या नगरसेवकांना, तर दुसरे कार्यालय शिंदेंच्या नगरसेवकांना दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सर्वच राजकीय पक्षांना कार्यालय दिले जाते. हे कार्यालय त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार देण्यात येते. 2017 मध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. त्याशिवाय अन्य अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा व मनसेतून आलेले सहा नगरसेवक असे 95 पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेकडे होते. त्यामुळे त्यांना सर्वाधिक मोठे पक्ष कार्यालय देण्यात आले होते. परंतु आता त्यांच्या नगरसेवकांची संख्या 65 झाल्यामुळे या कार्यालयाचा आकारही कमी करण्यात येणार आहे. कमी करण्यात येणाऱ्या या कार्यालयामुळे उर्वरित जागेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना पक्ष कार्यालय उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे समजते.
महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक मोठे कार्यालय राहणार असून दुसऱ्या क्रमांकाचे कार्यालय शिवसेना ठाकरे गटाचे असणार आहे. त्याशिवाय काँग्रेसपेक्षा शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय मोठे राहणार आहे. काँग्रेसला गेल्या वेळी एवढेच कार्यालय मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, तर समाजवादी पार्टीचे कार्यालय एमआयएम पार्टीला महापालिका सभागृहाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांना कार्यालय उपलब्ध करून द्यायचे झाल्यास त्यांना सरासरी 100 ते 150 चौरस फुटांचे कार्यालय मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे.
गेल्या चार वर्षांपासून पक्ष कार्यालय बंद असल्यामुळे पक्ष कार्यालयाची डागडुजी लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी रंगरंगोटीअंतर्गत फर्निचरचे पॉलिश व अन्य कामे करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.